Tuesday, 29 April 2014

दत्तक हाच पर्याय का?


“मावशी तुझं बाळ कुठे आहे?” जुईच्या या प्रश्नाने टचकन डोळ्यात पाणी आलं. “माझं बाळ? अग कशाला हवं तू असताना?” असं म्हणून मी तिचा एक पापा घेतला. “नाही तुझं बाळ हवं. सगळ्यांची असतातात. मलाही तुझं बाळ हवं. मला तुझ्या बाळाशी खेळायचंय.” मग मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला... “अगं तू माझी छानशी गोड भाची किनई? आणि मी तुझी मावशी?”
“हो”...जुई
“मग जर माझं बाळ आलं तर मला तुझ्याशी खेळता नाही येणार, तुझे लाड नाही करता येणार. त्या बाळाकडेच जास्त लक्ष द्यायला लागेल, त्याच्याच बरोबर राहावं लागेल. मग जुईला ते कसं आवडेल? म्हणून देवबाप्पा मला म्हणाला ‘मावशी मी तुला बाळ देणार नाही तू जुईलाच आपलं बाळ समज”
या उत्तराने ती क्षणभर शांत झाली, पण तिचा मेंदू यावरही उपाय शोधण्यात गुंतला होता हे तिच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. मग एक मिनिटभर विचार करून तिने एक उपाय शोधला आणि म्हणाली “मावशी तू आमच्या बाप्पाकडे बाळ माग न! तो नक्की देईल तुला बाळ. मी सांगते त्याला.” त्यांच्याकडे दरवर्षी माघी गणेशोत्सवात दीड दिवस गणपती बसवतात, त्या आपल्या घरच्या बाप्पाकडे वशिला लावण्याचा तिचा एक भोळा प्रयत्न चालू होता. तो मला नक्की मदत करेल याची तिला खात्री होती.
आता मलाही यावर काय उत्तर द्यावा हा प्रश्न पडला होता. मग मी क्षणभर विचार करून तिला म्हणाले “तुमच्या बाप्पाकडे दोनच बाळ होती, तू आणि तनुष. जी त्याने तुझ्या आई बाबांना दिली. मग आता त्याच्याकडची बाळ संपली, म्हणून आता तोही मला बाळ नाही देऊ शकत.” हे उत्तर तिला पटवून घेण्याखेरीज तिच्याकडे पर्याय नव्हता. परंतु ती शांत बसली नाही. ‘मावशी मला तुझं बाळ हवं’ असं म्हणत तिने भोकाड पसरलं. शेवटी राहुलने, तिच्या बाबांनी तिला दम भरल्यावर ती गप्प बसली. मी मात्र भरलेल्या डोळ्यांनी विचारात पडले.

या ना त्या पद्धतीने प्रत्येकाबरोबर हा विषय निघायचाच. सगळ्या लहान मुलांमध्ये famous अशा या मावशीला स्वतःच बाळ का नाही, याबद्दल सहानुभूती, दया, प्रश्न, दु:ख प्रत्येकाच्या चेहेऱ्यावर आम्हाला प्रत्येकवेळी आम्हाला दिसायचं.

त्या दिवशी विषय निघालाच. पल्लवीताई आणि केदार... आमच्याबद्दल अतीव कणव असलेलं प्रेमळ जोडपं. “तुम्ही काही ट्रीटमेंट का नाही घेत?”... केदार
सगळ्या ट्रीटमेंटस आणि उपाय करून झालेत आमचे. त्याचाही उपयोग होत नाही असं असलेलं आम्ही एक दुर्दैवी जोडपं आहोत”... मी.
“मग तुम्ही adoption चा विचार का नाही करत?” पल्लवीताईने सुचवून पाहिलं..
“नाही” आम्ही दोघेही एकदम म्हणालो.
आम्ही दोघेही या पर्यायाला तयार नव्हतो. मंदारने त्यातले काही प्रोब्लेम्स जवळून पाहिलेत म्हणून आणि मी...? माझा  प्रॉब्लेम या उपायाने सुटणारच नव्हता.
“का? तुम्हा सगळ्यांची मुलं आमचीच मुलं आहेत कि! आम्ही त्यांच्यासाठी करू. त्यांचे लाड करू.”...मी म्हटलं.
आमच्या मुलांसाठी काही कारण वेगळं आणि आपल्या स्वतःच्या मुलांसाठी काही करणं वेगळं.” पल्लवीताई म्हणाल्या.
“परंतु दत्तक मूल हे तरी आपलं स्वतःच कुठे असतं?”
“असं कसं? कायद्याने ते तुम्ही दत्तक घेता. तेव्हा ते तुमचंच. योग्य कायदेशीर पद्धतीने त्याला तुम्ही आपलं मानता.”
“तेच तर ...आपण तसं मानतो. खरं तर ते आपलं नसतंच. मग अशी जर सगळीच नाती आपल्या मानण्यावर असती तर प्रत्येकाने ठरवलं असतं कुणाला आई-वडिल, काका-काकू, भाऊ-बहिण वगैरे मानायचं ते. बरीच भांडणही कमी झाली असती जगातली. कारण तुम्ही एखाद्याला by choice आपलं म्हणून निवडता तेव्हा त्याचे गुण-दोष स्वीकारायची तुमची मानसिक तयारीही झालेली असते.”
“असं नसतं गं. उद्या तुम्ही एखादं मूल दत्तक घेतलंत, तर तुम्हाला हक्काचं मूल आणि त्याला हक्काचे पालक मिळतील, आई-वडिल मिळतील.”
“तेच तर! कसं असतं आम्ही नं ऑफिसमध्ये एखाद्या कामाबाबातीतला प्रत्येक निर्णय घेताना, त्यामागचं objective clear करतो. तसचं घरगुती किंवा माझ्या वैयक्तिक आयुष्यात मी प्रत्येक गोष्ट करताना माझा त्यामागचा मूळ हेतू काय आहे आणि माझ्या निर्णयाने तो साध्य होतोय का याचा मी विचार करते. आणि त्यावरूनच माझ्या असं लक्षात आलंय कि मूल दत्तक घेतल्याने माझा मूळ हेतूच साध्य होणार नाहीये.”
“म्हणजे? तुला नक्की काय म्हणायचं?”

“म्हणजे असं कि मूल दत्तक घेतल्याने मला पालाकात्वाच सुख मिळेल पण मातृत्वाचं सुख नाही मिळणार. मला फक्तं यशोदेच्या वाट्याला आलेलं सुख नकोय; देवकीला मिळालेलं सुखही अनुभवायचं.”
“परंतु दोन्ही नाही तर निदान एकतरी सुख?”
“नाही तसं नाहीये. मला मातृत्वातून पर्यायाने मिळालेलं पालकत्व अनुभवायचं, जबरदस्तीने मिळवलेलं पालकत्व मला नकोय.”
“मला अनुभवायचं डोहाळे लागणं म्हणजे काय, एखादी गोष्ट desperately खावीशी वाटणं म्हणजे काय? अशावेळेस मळमळत म्हणजे नक्की कसं वाटतं? पोटात काही नसूनही भूक लागत नाही अन्नाचा कणही नकोसा वाटतो हे कसं घडतं? बाळ पोटात हलतं तेव्हा कसं feel होतं? ते पोटात लाथा मारतं ते आपल्याला कसं कळतं? आपलं वजन वाढल्यावर आनंद कसा काय होऊ शकतो? पोट वाढल्यामुळे आपल्याच हातापायाची नखं कित्येक महिने आपल्याला दिसत नाहीत ...याची गम्मत कशी काय वाटू शकते? मला आता जाड झाल्यामुळे माझे जुने ड्रेस बसत नाहीयेत हे सांगताना एखाद्या बाईला वाईट कसं नाही वाटत? आपल्याला कधीही न आवडणारा एखादा पदार्थ आपल्याला अचानक आवडायला कसा लागतो? किंवा एखादा प्रचंड आवडीचा पदार्थ अचानक नकोसा कसा काय वाटू शकतो?”
“मला बघायचंय कि अगदी दगड मनाचा, कोडग्या स्वभावाचा आपला नवरा प्रत्येक पावलागणिक आपली काळजी कसा काय घेऊ लागतो? एरव्ही एका कामालाही हात न लावणारा नवरा दमून भागून आल्यावरही आपल्यासाठी इतकी कामं कशी काय करतो? माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या प्रत्येक सवयीला आणि आवडीला मुरड घालण्याइतका समजूतदार कसा काय वागू लागतो? इतरवेळेस छोटसंही काम राहू नये म्हणून मागे लागणाऱ्या सासूबाई जादू झाल्यागत बदलतात आणि मला त्रास होऊ नये म्हणून न झेपणारी कामंही कशा काय करू लागतात? दिवसागणिक “वय झालंय, आता नाही हं झेपत आम्हाला” असं म्हणणाऱ्या आई-वडिलांच्या अंगी अचानक दहा हत्तींचं बळ कसं काय येतं?”
माझी एक ऑफिसमधली मैत्रीण गरोदर राहिली, तर तिच्याशी सतत भांडणारा तिचा बॉस अचानक तिच्याशी खूप नरमाईने वागायला लागला. ‘ओरडणारी म्याडम’ असं तिला संबोधणारा आमचा ऑफिसबॉय तिची सगळी कामं न कटकटता करायला लागला. ती बाळंतपणानंतर कामावर रुजू झाली ना तेव्हा तिचा अनुभव सांगत होती. म्हणाली “बाळाला जन्म देणं म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्म म्हणतात ते अगदी खरंय, इतक्या मरणप्राय यातना होतात. पण आपल्याच रक्तमांसाचा जीव आपल्याच शरीरातून जन्म घेणार आहे हा विचारच त्या यातना सहन करायची ताकद देतो.” मला तेव्हा खरच क्षणभर जगातल्या साऱ्या मातांचा खूप हेवा वाटला. टीव्हीवर त्या बाळांच्या जाहिरातीत बाळाला दूध पाजणाऱ्या माता दाखवल्या न कि मला असं खूप वाटतं कि बाळ दूध पितानाचा स्पर्श मलाही अनुभवायला मिळावा. पण कितीही तान्ह बाळ मी दत्तक घेतलं तरीही मला हे अनुभव ते नाही देऊ शकत.

मला काय वाटतं माहितीये प्रत्येक जोडप्याने मूल दत्तक घेताना ‘आपण नक्की कुठल्या कारणास्तव मूल दत्तक घेत आहोत याचा नीट विचार करावा. कौटुंबिक किंवा सामाजिक दबावातून जर मूल दत्तक घेतलं तर तो त्या बालकावर होणारा अप्रत्यक्ष अन्याय असेल. कुटुंब किंवा नातेवाइकांत अथवा तथाकथित समाजाला दाखवून द्यायचा असेल कि  ‘हो आम्हालाही मूल आहे आणि आम्हालाही मूल वाढवता येतं’ आणि म्हणून मूल दत्तक घेतलं तर ते चुकीचं आहे. कुटुंबात अथवा समाजात दाखवण्यासाठी आपल्याला मूल हवं असेल तर खुश्शाल ‘दत्तक पर्याय’ निवडावा. परंतु अशामुळे भविष्यात होणारं त्या मुलाचं संगोपन हे कर्तव्य भावनेनेच होतं, जे खरतर अपूर्ण संगोपन असतं.
जर मनापासून “आम्हालाही मुलांची आवड आहे, आणि आम्हालाही दिवसरात्र एखाद्या मुलाचं संगोपन करायची इच्छा आहे, त्याच्यावर संस्कार करायचेत, दिसामासागणिक त्याचं वाढणं अनुभवायचं” अशी इच्छा मनात असेल तर ‘दत्तक’ हा पर्याय सगळ्यांच्याच दृष्टीकोनातून अगदी योग्य पर्याय ठरेल.