Wednesday, 6 May 2020

विरह - मुक्तछंद

काय होतंय नक्की कळत नाही, कारण खूप दिवस झाले... आपण भेटलोच नाही

गम्मत नाही त्या विनोदात, ज्यात तुझं हास्य नाही
चव नाही त्या जेवणाला, ज्यात तू भरवलेला प्रेमाचा घास नाही
अबोला आणि रुसण्यालाही काही अर्थ नाही कारण गालगुच्चे घेऊन मनवायला तू नाहीस
जगण्यातल्या कुठल्याच क्षणात ती गम्मत नाही ज्यात तू नाहीस
सगळं झालंय बेचव कशातही मन रमत नाही… कारण खूप दिवस झाले आपण भेटलोच नाही

तुला आठवतंय का आपला एकमेकांना झालेला पहिला स्पर्श???
खरंतर असं म्हणतात पहिला स्पर्श, पहिली मिठी, पाहिलं चुंबन विसरता येत नाही…
पण मला खरंच ते काही आठवत नाही…
कारण तुझा प्रत्येक नवा स्पर्श पहिलाच वाटावा असा उबदार, प्रेमाने आकंठ भरलेला... कधीच सोडवत नाही
वाट पहातेय आशेने त्या स्पर्शाची
त्वचा रुक्ष झालिये, शरीर कोमेजून गेलंय, रोजच्या साज शृंगारालाही काहीच अर्थ नाही...
कारण खूप दिवस झाले आपण भेटलोच नाही

तुला माहितीये घरातल्या वस्तूही माझ्याशी बोलतात!
तू कधी येणार विचारताना जागेवरून पडतात
ग्लास तुटले, कप फुटले सगळ्यांनी निषेध व्यक्त केला
मी मात्र धरून ठेवलंय स्वतःला, तुझ्या एका भेटीच्या आशेवर...
खुर्च्या, टेबल, ओटा… पलंग… कुणीच मला एकटीला बघू शकत नाहीत
कारण त्यांच्याजवळ जाताना माझ्यात माझा आत्माच नाही…
म्हणे आम्हाला चेतना देण्यासाठी तूच सचेतन नाहीस !!!
कसं समजावू त्यांना...आणि स्वतःलाही... काहीच कळत नाही…
कारण खूप दिवस झाले आपण भेटलोच नाही

सतत दिसते मला… तुझी ती आव्हानात्मक नजर…
तुझ्या अपरोक्षही किती व्यक्त होत असते…
बोलवत असते मला जवळ,
त्या नजरेत असलेली काळजी, प्रेम, खोडी, शृंगार… आणि मी…
मला सतत दिसत असते
पण नुसतं दिसून कसं चालेल…???
ती नजर हवी मला आत्ता… माझी खोडी काढायला, चहाटळपणा करायला, जवळ ओढायला, आणि स्वतःलाच शोधायला…
पण त्यासाठी तग धरून ठेवणं या वेड्या जीवाला काही कळत नाही… कारण खूप दिवस झाले आपण भेटलोच नाही

माहीत नाही मला ...इतके दिवसांनी भेटल्यावर काय होईल माझं ... आणि तुझंही !!!!
आधी मिठी की आधी चुंबन की आधी दर्शन की ….
छे… काय प्रतिक्रिया असेल काहीच कळत नाही!
कदाचित फक्त बघत बसेन तुला वेड्यागत, शोधत बसेन स्वतःलाच नव्याने, तुझ्या डोळ्यात डोळे घालून
किंवा...कदाचित घडणार नाही यातलं काहीच… कदाचित नजरेला नजर ही भिडणार नाही…
फक्त असेल एक घट्ट मिठी आणि जाणीव; एक झालेल्या हृदयाच्या ठोक्यांची… फक्त सचेतन झाल्याची एक खूण…
थांबेल क्षणभर सगळी सृष्टी, पृथ्वी, चंद्र, सूर्य, ... वारंही थांबेल क्षणभर… क्षमा मागतील आपली, वेगळं केलं आपल्याला म्हणून ढसा ढसा रडतील... 
वेड झालंय मन… काहीही विचार करतंय, तुझ्या भेटीच्या ओढीने सृष्टीला धारेवर धरतंय
कसं थांबवायचं या विचारांना??? काहीच कळत नाही…
कारण खूप दिवस झाले आपण भेटलोच नाही

आता या विरहाची पराकाष्ठा झालिये…
सहन होईना हा दुरावा जीवाची घालमेल वाढलिये…

आता डोळे उघडलेच मी तर आधी तू दिसावा,
झाला जरी स्पर्श मला तर तो तुझाच असावा.
रंध्रारंध्रात जाणवणारा गंध तुझा असावा
आला जरी आवाज मला...तो तुझाच असावा
बघू नये आता कुणीच मला ती नजर फक्त तुझीच हवी
श्वास जरी घेतला मी त्यात जाणीव तुझीच हवी, त्यात जाणीव तुझीच हवी...