Wednesday, 6 May 2020

विरह - मुक्तछंद

काय होतंय नक्की कळत नाही, कारण खूप दिवस झाले... आपण भेटलोच नाही

गम्मत नाही त्या विनोदात, ज्यात तुझं हास्य नाही
चव नाही त्या जेवणाला, ज्यात तू भरवलेला प्रेमाचा घास नाही
अबोला आणि रुसण्यालाही काही अर्थ नाही कारण गालगुच्चे घेऊन मनवायला तू नाहीस
जगण्यातल्या कुठल्याच क्षणात ती गम्मत नाही ज्यात तू नाहीस
सगळं झालंय बेचव कशातही मन रमत नाही… कारण खूप दिवस झाले आपण भेटलोच नाही

तुला आठवतंय का आपला एकमेकांना झालेला पहिला स्पर्श???
खरंतर असं म्हणतात पहिला स्पर्श, पहिली मिठी, पाहिलं चुंबन विसरता येत नाही…
पण मला खरंच ते काही आठवत नाही…
कारण तुझा प्रत्येक नवा स्पर्श पहिलाच वाटावा असा उबदार, प्रेमाने आकंठ भरलेला... कधीच सोडवत नाही
वाट पहातेय आशेने त्या स्पर्शाची
त्वचा रुक्ष झालिये, शरीर कोमेजून गेलंय, रोजच्या साज शृंगारालाही काहीच अर्थ नाही...
कारण खूप दिवस झाले आपण भेटलोच नाही

तुला माहितीये घरातल्या वस्तूही माझ्याशी बोलतात!
तू कधी येणार विचारताना जागेवरून पडतात
ग्लास तुटले, कप फुटले सगळ्यांनी निषेध व्यक्त केला
मी मात्र धरून ठेवलंय स्वतःला, तुझ्या एका भेटीच्या आशेवर...
खुर्च्या, टेबल, ओटा… पलंग… कुणीच मला एकटीला बघू शकत नाहीत
कारण त्यांच्याजवळ जाताना माझ्यात माझा आत्माच नाही…
म्हणे आम्हाला चेतना देण्यासाठी तूच सचेतन नाहीस !!!
कसं समजावू त्यांना...आणि स्वतःलाही... काहीच कळत नाही…
कारण खूप दिवस झाले आपण भेटलोच नाही

सतत दिसते मला… तुझी ती आव्हानात्मक नजर…
तुझ्या अपरोक्षही किती व्यक्त होत असते…
बोलवत असते मला जवळ,
त्या नजरेत असलेली काळजी, प्रेम, खोडी, शृंगार… आणि मी…
मला सतत दिसत असते
पण नुसतं दिसून कसं चालेल…???
ती नजर हवी मला आत्ता… माझी खोडी काढायला, चहाटळपणा करायला, जवळ ओढायला, आणि स्वतःलाच शोधायला…
पण त्यासाठी तग धरून ठेवणं या वेड्या जीवाला काही कळत नाही… कारण खूप दिवस झाले आपण भेटलोच नाही

माहीत नाही मला ...इतके दिवसांनी भेटल्यावर काय होईल माझं ... आणि तुझंही !!!!
आधी मिठी की आधी चुंबन की आधी दर्शन की ….
छे… काय प्रतिक्रिया असेल काहीच कळत नाही!
कदाचित फक्त बघत बसेन तुला वेड्यागत, शोधत बसेन स्वतःलाच नव्याने, तुझ्या डोळ्यात डोळे घालून
किंवा...कदाचित घडणार नाही यातलं काहीच… कदाचित नजरेला नजर ही भिडणार नाही…
फक्त असेल एक घट्ट मिठी आणि जाणीव; एक झालेल्या हृदयाच्या ठोक्यांची… फक्त सचेतन झाल्याची एक खूण…
थांबेल क्षणभर सगळी सृष्टी, पृथ्वी, चंद्र, सूर्य, ... वारंही थांबेल क्षणभर… क्षमा मागतील आपली, वेगळं केलं आपल्याला म्हणून ढसा ढसा रडतील... 
वेड झालंय मन… काहीही विचार करतंय, तुझ्या भेटीच्या ओढीने सृष्टीला धारेवर धरतंय
कसं थांबवायचं या विचारांना??? काहीच कळत नाही…
कारण खूप दिवस झाले आपण भेटलोच नाही

आता या विरहाची पराकाष्ठा झालिये…
सहन होईना हा दुरावा जीवाची घालमेल वाढलिये…

आता डोळे उघडलेच मी तर आधी तू दिसावा,
झाला जरी स्पर्श मला तर तो तुझाच असावा.
रंध्रारंध्रात जाणवणारा गंध तुझा असावा
आला जरी आवाज मला...तो तुझाच असावा
बघू नये आता कुणीच मला ती नजर फक्त तुझीच हवी
श्वास जरी घेतला मी त्यात जाणीव तुझीच हवी, त्यात जाणीव तुझीच हवी...

Thursday, 21 April 2016

सुगंधी संस्कृती


काही दिवसांपूर्वी TVवर एक जाहिरात पहिली... Ambi Pure Room Freshner ची. त्यात तो बोमन इराणी घरोघरी जाऊन त्यांच्या घरातल्या दुर्गंधी घालवतो. (तसं हल्ली celebrities नी सामन्यांची घरं साफ करायचं fadच आलंय)...तर...त्यात तो कुणाच्या तरी घरी जातो आणि त्यांना त्यांच्या घरातले नावडते दुर्गंध विचारतो आणि Ambi Pure हे product वापरून ते घालवून दाखवतो; अशी त्या जाहिरातीची मूळ संकल्पना आहे. तर या जाहिरातीत अशाच एका घरात तो जातो आणि त्या गृहिणीला विचारतो कि बाई गं असा कुठला वास आहे ज्याचा तुम्हाला तुमच्या घरात त्रास होतो अथवा घाण येते? यावर ती बाई जरा विचार केल्यासारखा दाखवते आणि म्हणते ... “अं...? तडका! तडका कारानेके बाद घर में जो odour फैलता है, क्या उसे आप मिटा सकते हो?”
मी हे वाक्य ऐकून अवाक् झाले. तडका???? अर्थात फोडणी? ज्या फोडणीच्या वासावरूनच आपली अर्धीअधिक भूक चाळवली जाते ती फोडणी? 

मी youtubeवर ती जाहिरात २-३ वेळा पहिली आणि इतकं दुःख झालं मला! या फोडणीच्या खमंग वासाला odour अर्थात दुर्गंधी म्हणताना या बाईला क्षणभरही त्रास नाही का झाला? आपल्या संस्कृतीत पदार्थ सगळ्यात आधी वासाने म्हणजेच नाकाने, मग डोळ्यांनी आणि मग तोंडानी खाल्ला जातो. अशा या वासाला सर्वाधिक महत्त्व असलेल्या संस्कृतीचा भाग असलेली ही बाई त्या स्वर्गीय खमंग वासाला odour म्हणते??? आमच्याकडे काकूसुद्धा मी स्वयंपाक करताना मधेच ओरडतात “उधळली तुझी फोडणी. वाश आला! वास नाही आला पाहिजे फोडणीचा.” अरेsssss??? मग अर्थ काय त्या फोडणीला? त्यातच तर सगळी मजा आहे.

परवा आमच्या घरी माझा एक मित्र आला. आल्या आल्या आत शिरतानाच म्हणाला “व्वा! छानपैकी लोणी कढवून झालेलं दिसतंय!” त्या खमंग तुपाचा वास अजूनही घरात दरवळत होता. हा इतका सुंदर गंधही बऱ्याच जणांना तोंड वेंगाडण्यासारखा का वाटतो कुणास ठाऊक! आणि room freshner च्या जाहिरातीसाठी तुम्ही ज्या फोडणीच्या वासाला odour म्हटलंत तीच फोडणी खमंग होण्यासाठी जो हिंग वापरतात, त्या हिंगाच्या जाहिरातीसाठी मात्र त्या वासाला महत्त्व दिलंय. काय हा विरोधाभास??? आपल्या संस्कृतीतल्या इतक्या महत्वाच्या गोष्टीचं किती चुकीच्या पद्धतीने marketing होतंय? हल्ली भावभावनांपासून ते चापालांपर्यंत कुठल्याही गोष्टीचा marketing किंवा advertising tool म्हणून वापर केला जातो. बदलत्या काळानुसार ते स्वाभाविक आहे आणि कदाचित गरजेचंही आहे. परंतु हे करताना आपण कुठल्याही मूल्यांची पायमल्ली तर करत नाही ना, कुठल्या गोष्टींबद्दल समाजाला चूकीचा संदेश तर नाही ना देत याबद्दल जागरूक राहायला हवं.
आपल्या संस्कृतीत खमंग, खरपूस, करपट, गोडसर, आंबट, मसालेदार, कडू या नुसत्या चवी नाहीत तर वासही आहेत. त्या, आधी आपल्या घ्राणेन्द्रीयांना कळतात आणि मग पदार्थ खाल्ल्यावर जिभेला किंवा रसनेला कळतात.

त्या दिवशी भाजी करताना मी आंबट चुका आणि आळू शिजवलं कुकरमध्ये. कुकर निवल्यावर झाकण उघडल्या उघडल्या जो काही अप्रतिम गंध वातावरणात दरवळला त्याला तोड नाही. आपण कुठली भाजी शिजवतोय किंवा परततोय हे वासावरून ओळखू शकतो. खरंतर ती शिजवतोय कि परततोय हेही वासावरूनच कळतं. एखादी उसळ गोडा मसाला घालून केलीये, कि मालवणी मसाल्याची आहे कि घाटी/आगरी/वैदर्भीय किंवा इतर कुठल्या मसाल्याची आहे हे त्या उसळीच्या वासावरूनच ओळखतो आपण. एवढंच कशाला त्या उसळीच कडधान्य देखील शिजवताना त्याला आलेल्या उकळीवरून किंवा कुकरच्या शिट्टीच्या वासावरून ते कडधान्य कुठलं आहे हे कळू शकतं. पूजेचं अथवा कार्यालयातल्या वरण भातातलं वरण हे गोडं वरण आहे कि साधं; हे ते उकळतानाच कळतं. कार्यालयातल्या जेवणाचा एक विशिष्ट गंध, उडप्याच्या हॉटेलातला एक typical वास, किंवा bar & restaurant मधल्या मद्य आणि तंदूर मिश्रित असा खाद्यपदार्थांचा वासाचा एक विशिष्ट दरवळ, पिझ्झा-बर्गर outlet मधील पाव आणि oragano मिश्रित एक वास हा त्या त्या ठिकाणच्या पदार्थांच्या विशिष्ट प्रमाणातील चायामुळे अथवा एकत्रीकरणामुळे(combination) येतो.

एखादी उत्तम सुगरण पदार्थात मीठ आहे कि नाही हे सुद्धा त्या पदार्थाच्या वासावरूनच ओळखते.

आपल्या संस्कृतीत कुठला पदार्थ कधी आणि किती खावा याचेही विधिनिषेध ठरलेले आहेत. ठराविक वेळेला ठरलेले अन्नपदार्थ शिजवून त्याचा सुगंध वातावरणात दरवळतो आणि त्या वेळेची, समारंभाची अथवा कार्याची वातावरण निर्मिती होते आणि आपल्या शरीरातील घ्राणेन्द्रिये उद्दीपित होऊन भूक लागते अथवा तो पदार्थ खाण्याची इच्छा प्रज्वलित होते. या शास्त्राधारित गोष्टीचा आधार घेऊनच आपल्या संस्कृतीत खाद्यपादार्थ बनविण्याचे काही विधिनिषेध आखलेले आहेत.

पावसाळी कुंद  वातावरणातच आपल्याला भजी/वडे अथवा तत्सम तळण खावेसे वाटते. किंवा थंडीच्या दिवसात पचायला जड पदार्थ किंवा गरमा गरम वाफाळलेला चहा प्यावासा वाटतो. लग्नकार्य अथवा होम-हवनाच्या दिवशी आपल्याकडे सात्त्विक शाकाहारी जेवणाची पद्धत आहे कारण त्यावेळी होत असलेल्या पूजा कार्यामुळे वातावरणात आणि उपस्थित मानवी शरीरात प्रचंड प्रमाणात उर्जा निर्मिती होते. म्हणून त्या उर्जेच्या पातळीला balance करण्यासाठी आपल्याकडे त्यावेळेस सात्त्विक भोजनाची पद्धत आहे.
मुळातच आपल्या संस्कृतीत खाद्यपदार्थांची स्वतःची अशी वेगळी जागा आहे आणि त्यांच्या येणाऱ्या गंधांची स्वतःची एक ओळख आहे. त्याचं आपल्या आयुष्यात एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. जे आपण ठरवूनही डावलू शकत नाही.

निरनिराळ्या चटण्या, कोशिंबिरी, आमट्या, भाज्या यांचे विशिष्ट गंध आहेत. तळण काढत असतानाही स्वयंपाकघराच्या बाहेर बसलेली व्यक्ती त्या तळणीत पुऱ्या आहेत, कि वडे-भजी आहेत, कि पापड-कुरडया-सांडगे आहेत हे ओळखते. एवढंच काय तर पापड उडदाचा आहे कि पोह्याचा कि बटाट्याचा कि आणखी कसला हेही तळणीच्या वासावरूनच कळतं.

त्या AmbiPureच्या जाहिरातीतील बाईचे डोळे बंद करून तिच्या नाकासमोर लोणच्याची किंवा खारातल्या मिरचीची बरणी धरून, वासावरून तोंडाला पाणीही सुटू शकतं हे पटवून द्यावंसं वाटतंय. किंवा त्याच लोणच्याची फोडणी (तिच्या भाषेत तडका) करताना तिला तिथे उभा करावं अस वाटतंय. म्हणजे फोडणीच्या वासाची जादू तिला कळेल. हे लिहिताना देखील इथे नसलेल्या लोणच्याचा वास येऊन माझ्या तोंडाला पाणी सुटलंय.

नुसतं फोडणी तळणीच्या गडद वासाबद्दल नव्हे तर फळे, गोड पदार्थांच्या सौम्य वासाचीही अशीच गम्मत आहे. उन्हाळ्यात पन्ह किंवा कोकम सरबताच्या नुसत्या वासानेच गार वाटतं. लिंबू, कैरी, चिंचेच्या आंबट वासाने एखादी गर्भवती सुखावते तर लहानमुलं गुलाबजाम, बासुंदी इतकंच काय तर cake किंवा pudding च्या वासाने त्या पदार्थाकडे अक्षरशः धाव घेतात. हा सगळा वासाचाच तर खेळ आहे. आपलं आयुष्यच जणू खाद्य-गंधांच्या तालावर नाचत. त्या गंधांनी भरलेल्या वातावरणातच तर आपण लहानाचे मोठे होतो. इतकंच काय तर प्रत्येक घराची देखील एक गंध-संस्कृती असते. भैय्या लोकांच्या घरातला राईच्या तेलाचा वास, गुजराथी-मारवाडी घरांमधला तुपाचा वास, दक्षिणात्य घरांमधला सांबार-रस्सम मसाल्यांचा वास, गोवन ख्रिश्चन घरातील माशाच्या आमटीचा/curry चा वास हे त्या त्या घरातल्या खाद्य-संस्कृतीचं प्रतिनिधित्व करतात.

अशा या गंध-संस्कृतीतल्या फोडणीसम कुठल्याही वासाला ‘दुर्गंधी’ किंवा ‘odour’ म्हणण्याची चूक कृपा करून या product manufacturers नी करू नये. आपल्याकडे सगळ्याच पदार्थाचं मूळ किंवा पाया असलेली फोडणीच जर जमली नाही तर पुढे त्या पदार्थाची बांधणीच फसते. इतकी अनन्यसाधारण आणि अतीव महत्वाची अशी हि गोष्ट आहे. तिलाच जर कुणी ‘दुर्गंधी’ संबोधलं तर त्यांच्या घ्राणेन्द्रियात आणि त्याच्याशी निगडीत शरीरातील हार्मोन सिस्टीम मध्ये नक्की बिघाड आहे.

यापलीकडे जाऊन बोलायचं झालं तर, ज्या माणसांना फोडणीचा वास odour वाटतो त्यांना, पहिल्या पावसानंतरचा मृद्गंध, उन्हाळ्याच्या आधी मोहोरलेल्या आंब्याचा वास, फुलबागेताला फुलांचा धुंद गंध, नव्या वहीचा कोरा वास, नव्या कापडाचा नवा वास... इतकंच काय तर नव्या चपलांचा चामडी वासदेखील काय गंधानुभव देतो हे कसं कळणार?
  


Thursday, 30 July 2015

प्रेम


म्हटलं तर छोटा अडीच अक्षरी शब्द! परंतु, किती मोठा अर्थ आणि महत्त्व लाभलय याला. तसं तर मानलं तर अख्खं जग यावरच आधारित आहे आणि नाही मानायचं ठरवलं तरीही माणूस नकळत त्यात अडकतो ... ‘प्रेम’. म्हटलं तर भावना, लागलं तर वेड, अडकलो तर व्यसन, केली तर भक्ती, झाली तर सवय, जपला तर व्यवहार, मानली तर कल्पना आणि नाही मनाला तर फक्त एक शब्द ...प्रेम

जगात सगळ्यात जास्त मतभेद असलेल्या दोन गोष्टी म्हणजे प्रेम आणि देव. पण खरंतर ही एकाच गोष्टीची दोन रूपं आहेत. आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यात देव पाहतो आणि ज्याला देव मानतो त्याच्यावरच प्रेम करतो. म्हणूनच कुण्या गीतकाराला ते गाणं सुचलं ...’तुझमे रब दिखता है, यारा मै क्या करू...’

कानेटकरांच्या म्हणण्याप्रमाणे ‘प्रेम म्हणजे देण्या-घेण्याचा व्यवहार’... तर बाबा म्हणतात तसं खरं निस्वार्थी, मीरेच्या प्रेमासारखं प्रेम आज जगात अस्तित्वातच नाही... तर मंदार म्हणतो मी तुझ्यावर प्रेम करतो याला काही कारणच नाही. कुणी काय म्हणतं, कुणी काय म्हणतं. परंतु, या सगळ्यात या छोट्याशा शब्दाचा अर्थ किंवा सर्वमान्य असा अर्थ मात्र कुणीच सांगू शकत नाही. खरंतर एकीकडे असही वाटतं कि प्रेम हे प्रेम असतं त्याला कशाला define करायचं? ते फक्त करायचं...जमेल तसं आणि झेपेल तसं. पण मग ज्यांना ते कळलं नाही त्यांचं काय? पण अशी माणसं जगात अभावानेच आढळतात. जशी माणसाला तहान लागते, भूक लागते... हे सगळं न शिकवता माणसाला आपोआप होत असतं. ते कधी व्हायला लागलं हे कळतही नाही. तसच प्रेमाचंही आहे. तेही माणसाला आपोआप होत असतं. फक्त प्रत्येक माणसाच्या आवडी आणि क्षमतेनुसार त्या त्या माणसाची तहान-भूक वेगळी. तसच प्रत्येक माणसाच्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार त्या त्या माणसाचं प्रेम वेगळ, त्या माणसाच्या प्रेमाची पद्धत वेगळी.

खरंतर प्रेम कुणावरही बसतं. वस्तूवर, वास्तूवर, माणसावर, प्राण्यावर ... या सगळ्यात सर्वाधिक चार्चीलं जातं आणि मानलं जातं ते त्याच्या आणि तिच्यातलं प्रेम. कारण आयुष्यातल्या सुवर्णकाळात अर्थात, ऐन तारुण्यात बहरणारं हे प्रेम असतं. कारण हे एकच प्रेम असं असतं जे दोन भिन्न लिंगी व्यक्तींना कळत्या वयात शब्दशः तन-मन-धनाने जवळ आणतं, एकत्र आणतं. म्हणूनच या प्रेमाची चर्चा आणि so called gossip  जास्त होत असतं.

बऱ्याच जणांचं, विशेषतः प्रेमविवाह झालेल्यांच असं म्हणणं असतं कि आता तो/ती पूर्वीसारखं/पूर्वीइतकं प्रेम नाही करत. परंतु खरतरं प्रेम तसच असतं फक्त आपण जसे प्रियकर-प्रेयसीतून नवरा-बायकोच्या रुपात येतो तसंच प्रेमही आपलं रूप बदलून एका नव्या स्थित्यंतरात प्रवेश करतं. प्रत्येक वयातलं आणि नात्यातलं प्रेम वेगळं असतं. त्याचे आवेग वेगळे, रूपं वेगळी. त्यातले राग-लोभ-आनंद वेगळे. म्हणूनच तर म्हटलं आहे ना ‘प्रेमा तुझा रंग कसा’. या प्रेमाला ज्या रंगात आपण मिसळू, ज्या भावनेने आपण त्याकडे बघू; तो रंग किंवा ती भावना प्रेम धारण करतं. म्हणूनच त्या त्या वयातलं, क्षणातलं आणि परिस्थितीतलं प्रेम आपण तसच्या तसं स्वीकारायला हवं आणि ते पुरेपूर उपभोगायला हवं.
पहिल्या नजरेत आणि नवथर तारुण्यात हळुवारपणे उमलणारं प्रेम वेगळं आणि लग्नानंतर काही वर्षांनी नवरा-बायकोच्या नात्यातलं मुरलेलं प्रेम वेगळं. Retirement ला आलेलं असताना आपल्याच साथीदाराकडे नव्या दृष्टीने आणि जोमाने ओढलं जाणारं प्रेम वेगळं तर अगदी उतार वयात फक्त सहवासातून व्यक्त होणारं प्रेम वेगळं. 

त्या त्या वेळचं त्या त्या वयातल्या गरजा भागवणारं ते प्रेम.

कधी घट्ट मिठीतून व्यक्त होतं, तर कधी एका कटाक्षातून जाणवतं.

कधी दीर्घ चुंबनासाठी आसूसतं, तर कधी एक झलक दिसावी म्हणून तळमळतं.

कधी ढसाढसा रडवतं तर, कधी हातही उगारायला लावतं.

प्रेम आयुष्यात काहीही करायला भाग पाडतं.

फक्त एकच असतं ...

या एकाने काहीही करण्याला दुसऱ्याने समजून घ्यायचं असतं

आणि त्या दोघांच्या ‘एकमेकांचं काहीही समजून घेण्याला’ जगाने समजून घ्यायचं असतं...

यालाच ‘प्रेम’ म्हणायचं असतं.





Wednesday, 18 June 2014

त्याची-माझी एक अपूर्व भेट!!!

                            

आमच्या तिघांचं...म्हणजे मी, आई आणि बाबा... आमचं चार-पाच दिवस दापोलीला जायचं ठरलं. कामानिमित्त जरी जायचं असलं तरीही मी खूप आनंदात होते, कारण मला ‘त्याला’ भेटायला मिळणार होतं. कित्त्येक दिवसांनी, जवळ जवळ वर्षभराने भेटणार होतो आम्ही. कधी एकदा त्याला भेटतेय असं मला झालं होतं. आमचं या tripमध्ये भेटायचं ठरलही होतं. आई-बाबांचा मी त्याला भेटण्यावर आक्षेपही नव्हता कधी.

अचानक त्यादिवशी रात्री मंदार म्हणाला “मीपण काहीतरी adjust करतो आणि येतो तुमच्या बरोबर.”
मी चरकले. हा आला असता तर त्याला भेटायचा माझा सगळा plan फिस्कटला असता. मी मनातल्या मनात प्रार्थना करत होते कि ‘हा नको येऊ दे रे देवा’. मंदारच्या समोर का मी त्याला भेटणार होते? आणि मंदारला बरं आवडलं असतं हे? त्या दोघांच्यामधून विस्तवही जात नाही. आणि मंदारसकट मी त्याला भेटायचं? संसार मोडेल कि माझा! छे छे!! कल्पनाच करवत नव्हती मला. पण काय करावं तेही सूचत नव्हतं. मंदारला कसं टाळाव हेच कळेना. मंदार मूळचाच कोकणी माणूस. त्यामुळे कोकणात, त्यातूनही खुद्द दापोलीत त्याला येण्यापासून परावृत्त करणे केवळ अशक्यच. तरीही माझे विचार चालूच होते.
मग तो घरी आल्यावर रात्री झोपताना मी त्याला म्हटलं “हे बघ आधीच तुझ्या ऑफिसमध्ये प्रॉब्लेम्स चालू आहेत. त्यातून तू अशी अचानक सुट्टी वगैरे घेतलीस तर तुझेच प्रॉब्लेम्स वाढतील. नवीन नोकरीमुळे तुला सुट्ट्याही कमी आहेत यावर्षी. emergencyसाठी ठेव जपून. का आत्ता विनाकारण वाया घालवतोयास?”
पण छे! त्याला माझ्या समजावण्यात खोट जाणवलीच. म्हणाला “काय गं, नेहमी कुठेही जाताना ‘चल ना माझ्याबरोबर, तुझ्याशिवाय bore होतं’ अशा complaints असतात तुझ्या आणि यावेळेस अचानक मला येऊ नकोस असा सल्ला देतेयस? हा बदल कसा काय झाला बुवा?”
मला क्षणभर काय बोलावं सुचेना. मग म्हटलं,
“नाही रे. यावेळेस कामासाठी म्हणून चाललोय न आम्ही. नंतर परत तुला फिरायला नाही मिळालं तर तूच bore होशील. म्हणून म्हटलं.”
“नाही. मी नाही होणार bore. मी येतोय. ऑफिसमध्ये काय कारण सांगायचं ते मी बघतो.” तो म्हणाला आणि पलीकडे तोंड करून झोपी गेला.
आता आली का पंचाईत? त्याला कसं भेटणार? आणि मंदारसमोर भेटले तर आम्हाला दोघांनाही भांडायला नवीन कारण मिळणार. विचारांनी डोकं भणभणायला लागलं. पण आता काही पर्यायाच उरला नव्हता. ‘कबाबमध्ये हड्डी पडायचीच होती.’ परंतू मंदार येणार आहे म्हणून तू मला भेटायला येऊ नकोस असं त्याला सांगणंही मला जीवावर येत होतं. मी शांत राहायच ठरवलं. plan मध्ये काहीही बदल न करता जायचं ठरवलं. ‘होऊ दे काय व्हायचं ते. बघून घेऊ पुढंच पुढे.’ अस म्हटलं आणि डोळे मिटून झोपेची आराधना करत राहिले. उशिरा कधीतरी झोप लागली.

सकाळी लवकरच निघायचं ठरलं होतं. त्याप्रमाणे सकाळी लवकर उठून आम्ही आवरलं. तो दापोलीत नक्की किती वाजता पोहोचेल हे त्याने कळवलं नसलं तरीही मी पोहोचेन त्याचं दिवशी तो पोहोचेल एवढं मात्र नक्की सांगितलं होतं. माझी निघायच्या आधी सगळी उजळणी करून झाली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला भेटायला जातानाचे कपडे घेतले का हे बघितलं. सगळं घेतलं होतं. आम्ही निघालो.
आपल्या जीवलगाच्या ओढीने मनात फुलपाखरं कशी बागडतात याचा अनुभव मी घेत होते. विचारांनी मन कुठे कुठे धावत होतं. शेजारी मंदार बसलाय याची तमा न बाळगता मनातल्या विचारांनी मी स्वतःशीच हसत होते. मंदारनी तिथेही मला पकडलंच. म्हणाला, “काय गं, स्वतःशीच हसतेयस? काय चाललंय डोक्यात?”
“नाही रे! काही नाही. एक जोक आठवला, म्हणून हसू आलं.” मी सावरून घेत म्हटलं.
माझे विचार माझ्या डोक्यात आणि त्याचे त्याच्या...छे! त्याच्या डोक्यात driving करताना का कधी विचार असतात? तो, गाडी आणि रस्ता! बस्स! एवढंच त्याचं विश्व असतं. तो आपल्याशी बोलत जरी असला तरीही तो वेगळ्याच विश्वात रमलेला असतो. आणि त्याला त्या विश्वात रमताना बघून मीही रंगून जाते. पण आज मी हे क्षण enjoy करू शकत नव्हते. मला वेगळ्याच कुणाचीतरी चाहूल लागलेली होती. त्याच्या ओढीनेच माझा प्रवास सुरु झाला होता. आणि त्याच्याबद्दल असलेली ही ओढच मला सख्ख्या नवऱ्याशी बेईमान व्हायला भाग पाडत होती. किती विचित्र अनुभव होता हा! एकाच वेळेस मी प्रेम, भय, आतुरता, राग सगळे भावरंग अनुभवत होते. आणि या सगळ्या भावरंगांच्या मिश्रणातून तयार झालेला माझ्या मनातला भावरंग मला कुठल्यातरी वेगळ्याच जगात नेऊन ठेवत होता. जिथे फक्त ‘तो आणि मी’ ठळक रंगात दिसत होतो. आणि बाकी सगळे धूसर फिक्क्या रंगात आमच्या भोवतीने उभे राहून आमच्या ठळक रंगाचा हेवा करत होते.

भेटीच्या ओढीने विचार अगदी वेगात पळत सुटलेले. खाण्या-पिण्याचा ब्रेक झाल्यावर आम्ही पुन्हा मार्गाला लागलो. आई-बाबा वाचून झाल्यावर आता डुलक्या घेत होते. इंदापूर गेल्यावर घाट लागला. मला मधेच भास झाला कि आम्ही त्याला क्रॉस केलं. घाटातलं माझं आवडतं ठिकाण ‘देशमुख बाग वाडी’...त्याचंही आवडतं ठिकाण. वाटलं इथेच भेटेल कि काय? पण छे! मंदारने थांबूच दिलं नाही. मला वाडी pass होताना परत तो क्रॉस झाल्यासारखा वाटला. पण कदाचित मनातल्या विचारांमुळे होणारे ते भासही असतील म्हणून मी सोडून दिलं.
आणि अचानक... घाट उतरताना मला तो दिसला...क्षणभर हृदयाचा ठोकाच चुकला. मी त्याला भान हरपून बघतच बसले. आसपासच्या सगळ्या गोष्टींचा विसर पडून मी त्याचं रूप न्याहाळण्यात गुंग झाले.
काही वेळात भानावर आले तेव्हा मंदार मला खांद्यावर चापटी मारत विचारात होता “काय गं? कुठे तंद्री लागलीये?”
मी काय सांगणार होते? म्हटलं काही नाही “मस्त  sexy climate चा आनंद घेतेय.”
“असा? तंद्री लावून?” ...मंदारने विचारलं.
“हो मग! वातावरणच इतकं छान आहे कि हरवून जावं.” ...मी
“नक्की कशात हरवलीयेस? एकंदर वातावरणात कि एका कुठल्या ...?” मंदार
“हो हो! एकंदर वातावरणातच.” मी त्याला तोडत म्हटलं.
अर्थात मंदारला शंका आलीच होती, माझे इरादे नेक नाहीयेत याची. तो मला चांगलाच ओळखून होता. स्वाभाविकच आहे. नवरा आहे तो माझा.

आम्ही दापोलीत जवळ जवळ पोहोचलोच होतो. घाट, डोंगरमाथा, नुकतंच पाणी शिंपडलं गेल्यामुळे तरारलेली हिरवाई... जणू न्हालेल्या नव्या नव्या नवरीसारखी मोहक दिसत होती. सगळं कसं बेधुंद करणारं वाटत होतं. या वातावरणात एक वेगळीच नशा होती... या हिरव्या रंगाच्यासुद्धा निसर्गात किती छटा दिसत होत्या...गडद हिरवा, फिका हिरवा, पिवळट हिरवा, काळपट हिरवा, लाल-हिरवा, पोपटी...असे अनेक. हे रंग डोळ्यात अन मनात साठवताच येत नव्हते.
आम्हाला पोहोचायला दुपार झाली. जेवणं आटोपून आम्ही कामाला लागलो. दोन-तीन लोकांना भेटायचं होतं. ती भेटाभेटी केली. घराची काही कागदपत्र ताब्यात घ्यायची होती, ती घेतली. आणि सगळं आटोपल्यावर घरी आलो. उकाड्याने आम्ही अगदी जिगजिगून गेलो होतो. फ्रेश होऊन चहापाणी होईस्तोवर दुपार उतरली. आणि इतका वेळ विसर पडलेल्या ‘त्याची’ मला पुन्हा प्रकर्षाने आठवण झाली. मी मंदारला म्हटलं चल दत्तावर जाऊ. दत्तमंदिर हि माझी सगळ्यात आवडती जागा...आणि त्याचीही. तिकडे तो नक्की भेटेल याची मला खात्री होती. मंदारला पक्कं ठाऊक आहे, मी दापोलीत आल्यावर दत्ताला जाऊन आल्याशिवाय परतणार नाही. (मी मंदारला बोलता बोलता म्हटलंही की “मी मरायला टेकले आणि माझी शेवटची इच्छा पूर्ण करायची वेळ आली, तर न विचारता, न सांगता मला दत्तावर आण.”)

आम्ही दत्तावर जायला निघालो. तेवढ्यात माझ्या लक्षात आलं, मी कपडेच बदलले नाहीयेत. मी पटकन मंदारला म्हटलं “जरा थांबतोस? मी लगेच कपडे बदलून येते.”
“नाही! अजिबात वेळ घालवायचा नाही. मला माहितीये तुला कपडे का बदलायचेत ते. पण मी तुला अजिबात असं काहीही करू देणार नाहीये. चल गुपचूप तशीच.” मंदारने मला दटावलं. त्याला शंका आलीच होती. मी गपगुमान निघाले.
यावेळेस तिकडे जायला रस्ता केला होता, चांगला डांबरी. मी खूष झाले. कारण पूर्वी कच्चा रस्ता होता. एखाद-दीड किलोमीटर चालत जावं लागायचं. माझ्या पोटात गुदगुल्या व्हायला लागल्या. मनातली आतुरता चेहेऱ्यावर स्पष्ट दिसू लागली.

आम्ही पोहोचलो. आधी देवळात गेलो. दत्ताचं दर्शन घेतलं. विशेष म्हणजे त्यादिवशी नेमका गुरुवार होता. परंतू मंदिर जुनं आणि खाजगी मालकीतलं असल्यामुळे तिथं कुणीही नव्हतं. नेहमीप्रमाणे देवळातली दोन माणसं तिथे देवाचं म्हणत बसलेली. सहसा मी देवाकडे काही मागत नाही. पण आज मागितलं. “देवा, आज तुझा वार आहे. मला विशेष काहीही नकोय, पण आज त्याची माझी भेट घडवून आण. आजच्या दिवशी एवढं दान माझ्या पदरात टाक.” असं मी मनात म्हटलं आणि नमस्कार करून आम्ही देवळाच्या बाहेर पडलो.

या देवळाच्या मागे थोडी मोकळी जागा आहे.  तिथून समुद्रकिनारा असा खाली नजर टाकून पहावा लागतो. Below eye level समुद्र क्वचित पहायला मिळतो. तिथून खाली किनाऱ्यावर उतरायला दगडी पायऱ्या आहेत. अतिशय निर्जन असा हा भाग आहे. अगदी चिटपाखरूही नसतं या भागात.
दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही या मोकळ्या भागात आलो. समोर अथांग समुद्र...नजर जाईल तिथपर्यंत फक्त पाणी आणि क्षितिजावर अस्ताला जाण्यास अधीर झालेला सूर्य. पारणं फिटलं डोळ्याचं. सगळं होतं...फक्त तो नव्हता. अचानक बेफाट वारा सुटला. समुद्र खवळला होताच, पण लाटांची उंची आणि आवाज वाढवून त्याने आणखी खवळल्याचे संकेत दिले. मला चाहूल लागली म्हणून मी डावीकडे बघितलं... तर काय!!! तो माझ्याच दिशेने धावत येत होता. मी अनाहूतपणे त्यादिशेला धावले आणि ओरडले “मंदार बघ तो आला.”
मंदारने झर्रकन डावीकडे पाहिलं आणि तो धावतच देवळाशी गेला.
अन क्षणार्धात पावसाने मला कवेत घेतलं. मी त्याच्या ओल्या मिठीत भिजून गेले. “किती वाट पाहायला लावलीस?” मी कळवळून म्हणाले, तर त्याने मला गडगडाट करून आणखीन घट्ट जवळ ओढलं. वर्षभराचा आमचा विरह आज संपला होता. समुद्र, सूर्य आणि खुद्द दत्ताच्या साक्षीने आमच्या भेटीचा एक अपूर्व सोहळा पार पडत होता.

तो माझ्यात अन मी त्याच्या धारांत एकरूप झालो होतो. ओलेचिंब होऊन एका वेगळ्याच विश्वात गेलो होतो... एका अशा विश्वात जिथे आमच्या भेटीचा रंग अगदी ठळक जाणवत होता...आणि मंदार? तो देवळाच्या आडोशाला फिक्क्या रंगासारखा ...आमच्या प्रेमभेटीच्या ठळक रंगाचा हेवा करणारा...

Friday, 6 June 2014

भाषा बोलू लागली तर!!!


रविवार दुपारची वेळ. जरा उशिरानेच जेवणं आटोपल्यावर मी वर्तमानपत्राच्या पुरवण्या वाचत पडले होते. हल्ली शनिवार-रविवारच्या पुरवण्या खूपच वाचनीय असतात. त्या वाचण हा माझा weekend दिनक्रमच झालाय. वाचता वाचता वर्तमानपत्रातल्या printing mistakes ना शिव्या देण्याचं माझं कर्तव्य मी न चुकता पार पाडत होते.
अचानक फोन खणखणला. छानपैकी पेपरचा गठ्ठा जवळ घेऊन लवंडलेलं असताना उठून फोन घ्यायचा मला अगदी कंटाळा आला होता. पण काय करणार ‘नाईलाज को क्या ईलाज’? मी नाखुषीनेच उठले आणि फोन उचलला.

“hello?”
“नमस्कार! हा दोन पाचशे सत्तेचाळीस सोळा पन्नास क्रमांक आहे का?” ...पलीकडून एका स्त्रीने अतिशय मंजूळ आवाजात आणि अदबीने विचारलं. त्या आवाजात इतका गोडवा होता कि मी सगळा वैताग विसरून गेले.
नंबर मराठीत सांगितल्यामुळे समजायला जरा वेळ लागला. आपण घरी मराठीत बोलत जरी असलो तरीही फोन नंबर कधीच मराठीत सांगितला जात नाही. माझा क्षणभर गोंधळच झाला.
मग मी म्हटलं “हो. नंबर बरोबर आहे. आपण कोण? आणि आपल्याला कुणाशी बोलायचं?”
“मी भाषा बोलतेय आणि मला तुझ्याशीच बोलायचय.” पलीकडून आवाज आला.
“भाशा? कोण भाशा? मी नाही ओळखत.” ...मी म्हटलं
“अगं भाशा नव्हे भाषा. मी भाषा बोलतेय. पोटफोड्या ष” ...ती अगदी अजिजीनं बोलत होती.
“बरं हो भाषा! पण मी कुणा भाषाला नाही ओळखत. तुम्हाला नक्की कुणाशी बोलायचय?” ...मी थोड्याशा वैतागानेच विचारलं.
“अगं हो हो. अशी वैतागू नकोस. मी तुझ्याशी पहिल्यांदाच दूरध्वनीवरून बोलतेय, खरंतर संवादच पहिल्यांदा साधतेय. त्यामुळे तुझ्या लक्षात न येणं साहजिकच आहे.” ...ती स्त्री त्याच मंजूळ आवाजात जराही न कटकटता बोलत होती.
मला जरा आश्चर्यच वाटलं. मेंदूचा एक कप्पा आपसूकच आपल्याला भाषा नावाची कुणी व्यक्ती भेटलेली का हे शोधण्यात गर्क झाला. परंतू काही केल्या ही मंजुळा मला ओळखीची वाटेना. आवाज तर इतका गोड आणि वाणीत इतकी आत्मीयता भरलेली होती कि ही ‘मंजुळा’ आपल्या ओळखीची निघावी असं फार वाटत होतं. पण नाहीच. काही linkच लागत नव्हती.
“नाही हो. माझ्या ओळखीत कुणी भाषा नावाची व्यक्ती नाहीये.” ...मी पुन्हा सांगितलं
मग ती भाषा (कि मंजुळा?) पुढे बोलू लागली,
“अगं मी भाषा! मराठी भाषा! जी तू आणि तुझ्या घरातली माणसं बोलण्यासाठी वापरता. तथाकथित स्वतःला ‘आम्ही मराठी’ म्हणवणारे लोकही बोलण्यासाठी माझा वापर करतात. तीच मी. मराठी भाषा.”
“काsssssssssय?” मी चक्रावून जवळ जवळ ओरडलेच. “कसं शक्य आहे? भाषेला का कधी जीव असतो? ती का कधी बोलू शकते? कोण तुम्ही? आणि मला असं का फसवताय?” मी चक्रावलेल्या अवस्थेतच प्रश्नांची सरबत्ती लावली.
“वा! बोलण्यासाठी जिचा वापर करतेस तिचं बोलू शकणंच नाकारतेस? आणि जीवाचं म्हणशील तर हो, भाषेला जीव असतो. मनही असतं. ज्या मनावर सध्याच्या तथाकथित मराठी भाषिकांनीच ओरखडे ओढलेत आणि घायाळ केलंय माझ्या जीवाला. तू माझा खूप विचार करतेस असं जाणवलं. म्हणून वाटलं तुझ्याकडे मन मोकळं करावं, तू माझी व्यथा नक्की समजून घेशील. पण तू जर इथे माझं अस्तित्वच नाकारत असशील तर तुझ्याशी बोलण्यात तरी काय अर्थ आहे?” तिचा आवाज तितकाच मंजूळ पण किंचित दुखावलेला वाटला.
मग मीच पटकन सावरले आणि म्हणाले, “अगं भाषा थांब. sorry. चुकलंच बघ माझं. असा अविश्वास दाखवायला नको होता मी.”
“sorry????????? अगं माफ कर असं म्हणायला कमीपणा का वाटतो? इथेच सिद्ध होतं कि स्वभाषेत बोलताना त्या त्या शब्दातून प्रतीत होणाऱ्या भावना किती खोल असतात. तुम्हाला sorry म्हणताना तितका अपराधीपणा जाणवत नाही जितका माफ कर किंवा क्षमा कर म्हणताना जाणवतो.”
मला शरमल्यासारखं झालं. खरं होतं तिचं म्हणणं. मग मीच म्हणाले तिला, “माफ कर. चूक झाली माझी.”
“नशिब माझं चूक म्हणालीस, चुकी नाही म्हणालीस. परवा त्या कुठल्याशा मालिकेत ती नायिका आपल्या सासूला म्हणते “सासूबाई sorry, चुकी झाली माझी” हे बोलताना होणारी चूक तिच्या लक्षातच आली नाही. शीsssss! चुकी? हा शब्द तरी आहे का गं मराठीत? मूळ शब्द चूक आणि प्रत्यय लावून कशाबद्दल किंवा कुणाबद्दल तरी बोलताना चुकीचा/चुकीची असं म्हणतात. परंतू हल्ली मराठी भाषा, व्याकरण दृष्ट्या चूक-बरोबर ठरवणं कठीणच झालंय. हल्ली तर एक टूम किंवा नव्हाळी म्हणून ....तुमच्या भाषेत fashion म्हणून चुकीचे शब्द वापरतात.”
तिने सगळे मोठमोठे भाषा तज्ञ सोडून मलाच का फोन केला ते आत्ता माझ्या लक्षात आलं. चित्रपट-मालिकांमधे वापरल्या जाणाऱ्या मराठी भाषेवर माझी सतत चिडचिड चालू असते.
“बरोबर आहे. तुझं म्हणणं पटतंय मला. आणि हेही कळतंय की तुला फोन करून माझ्याशीच बोलावसं का वाटलं?” मी म्हणाले.
“योग्य शब्द वापरलास बघ तू, ‘माझ्याशी’. नाहीतर ती ईशा...”
“कोण ईशा?” मी विचारलं
“आग तीच गं ती ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ मधली ईशा. सारखं सोबत म्हणते. सगळं तिला सोबत करायचं असतं. त्या दिवशी म्हणते कशी, ‘मी त्यांच्यासोबत फोनवर बोलून घेतलं’... ‘त्यांच्या सोबत???’ अगं मराठी भाषा व्याकरण शिकलोय ना गं आपण शाळेत? मग तृतीया विभक्ती प्रत्यय ने,ई,शी कसे गं विसरतात हे??? ‘त्यांच्याशी बोलले’ इतकं साध सोप्प मराठी का उगाच क्लिष्ट करतात हे? आणि या ईशाला तर सोबत हा शब्द इतका आवडतो ना की ती तो सगळीकडे वापरते. ‘मी येऊ का तुझ्या सोबत?’ आणि ‘आपण दोघी सोबत जाऊ’ या दोन्ही वाक्यात हा शब्द नाही चालणार. ‘तुझ्या बरोबर येऊ का’ असं म्हणायला हवं. ‘सोबत’ हा शब्द आपण गरज असल्यास एखाद्याच्या बरोबर जाणे यासाठी वापरतो. आणि सोबत जाऊच्या ऐवजी ‘आपण दोघी एकत्र जाऊ’ असं म्हणायला हवं. आपल्या मराठीत आहे ना एवढी शब्दसंपत्ती, मग वापरा ना. कमी का करताय?. ‘साथ चले’ असं हिंदीत म्हणतात ...त्याचं भाषांतर केलं आणि दिलं ठोकून मराठीत ‘सोबत जाऊ’.”
तिच्या त्याच मंजूळ आवाजाला आता कळकळीचा सूर प्राप्त झाला होता.
“हो अगं! मलाही खुपदा, खरंतर प्रत्येकवेळी हे जाणवतं. पण बोलणार कुणाला, काय अन किती? आपण जरा कुठे चूक दाखवायला जावं किंवा सुधारणा सुचवायला जावं तर ग्रामीण-नागरी असा वाद सुरु करतात.” ...मी म्हटलं.
“अगं ग्रामीण-नागरी हा भाषेच्या उच्चारातला आणि त्या त्या भागातल्या लोकांच्या वैशिष्ट्यांमध्ये असलेला फरक आहे. यात चूक बरोबर असं काहीच नसतं. कोकणी लोक सानुनासिक उच्चार करतात तर मराठवाडा-वैदर्भीय हेल काढून बोलतात. ‘केव्हातरी’ला कवातरी म्हणणं हा उच्चारणातला किंवा भौगोलिक दृष्ट्या भाषेला येणाऱ्या बोली स्वरूपातला फरक आहे. या बदलामुळे तो शब्द चुकीचा ठरत नाही.”
इतके दिवस ग्रामीण-नागरी हा फरक एखाद्याला कसा समजवावा असा विचार मी करत होते. तेच या ‘भाषा’नी अगदी सोप्प करून समजावलं.
“आता हि प्रिया. backless पोलकं घालण्याइतकी पुढारलेली दाखवली आहे. परंतू, तिची भाषा ऐक आणि गावाहून आलेल्या आजीचं मराठी ऐक. आजी गावाकडची असून अन ग्रामीण भाषा असून योग्य मराठी बोलते. तर ही प्रिया शहरी असून किती चुका करते. हा फरक पाहिल्यावर शहरी लोकांना खरच पुढारलेलं म्हणायचं का असा प्रश्न पडतो.”

“कोण प्रिया? कोण आजी?” मला काहीच कळलं नाही हि कुणाबद्दल बोलतेय ते.
“आणि काय गं तू backless हा इंग्रजी शब्द कसा काय वापरलास?” मी तिची दांडी उडवण्याच्या खट्याळ हेतूने विचारलं.
ती हसली, खूsssssssप हसली आणि म्हणाली, “अगं वेडी का काय तू? जे शब्द मुळात मराठीत नाहीत ते मी मराठीत कसे वापरेन? backless वस्त्र मुळात आपल्या संस्कृतीत नाही. जग खूप जवळ आल्यामुळे ते आपल्या संस्कृतीत आलं. त्यामुळे त्याला मूळ मराठी शब्दच नाही आणि मला तो अट्टाहास कारायाचाही नाही. तुम्ही जर त्यासाठी मराठी शब्द तयार केलात तर मला आनंदच आहे. माझीच शब्द संपत्ती वाढेल.”
तिचा मुद्दा पटण्यासारखा होता खरा. मी जरा खट्टू झाले,...मला तिची विकेट काढता आली नाही म्हणून. ती पुढे बोलू लागली... “प्रिया आणि आजी म्हणजे हनुमानाच्या शेपटीसारख्या वाढवत नेलेल्या ‘तू तिथे मी’ मालिकेतल्या दोघी”
“होsss! बरं झालं बाई संपली एकदाची ती मालिका. पण त्या दोघींचं काय म्हणत होतीस तू?” ...मी
“तर ती प्रिया गं. त्या दिवशी एकदा म्हणाली, ‘तू माझ्या भांगेत कुंकू भर.’ ...अगं sssss!!!!! केसांचा भांग आणि प्यायची भांग हा फरक का तिला माहित नाही? भांगात कुंकू भरतात आणि ती भांग पितात.
आणि पुढे ऐक. एक दिवस म्हणते कशी ‘तू माझ्या वाट्याला जाऊ नकोस.’ ...वाट्यालाsssssss??? अगं संपत्तीतला वाटा, बाजारात फुलांचा मिळतो तो वाटा. परंतू आपली चालायची किंवा मार्गक्रमण करायची असते ती वाट. ‘माझ्या वाटेला येऊ नकोस’ असं म्हणायचं असतं एवढं साध कळत नाही?
अगं हल्ली मालिका-चित्रपटात सर्रास ‘मी आलेली, मी गेलेली’ असं म्हणतात. प्रथम पुरुष प्रत्यायात ‘मी आले’ आणि तृतीय पुरुष प्रत्यायात ‘ती आली/गेली’ असं म्हणतात. पण तुमच्या shortcutच्या जमान्यात सगळ्या प्रत्ययात तेच क्रियापद वापरतात. काय ही माझी लक्तरं करताय तुम्ही? मला त्रास होतो याचा.” तिचा मंजूळ आवाज अगदी खोलात गेला.
“तू बोलतेस ते योग्य आहे भाषा. मी माझ्या परीने खूप प्रयत्न करते माझ्या संपर्कातल्या लोकांची भाषा सुधारण्याचा. परंतू मी कुणी महान किंवा प्रसिद्ध पंडिता नाहीये कि मी सांगावं आणि सगळ्यांनी त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवावा.” ...मी माझी अडचण व्यक्त केली.
“हो पण तू प्रयत्न तर करू शकतेस ना? लोकांनी लगेच विश्वास नाही ठेवला तरीही विचार तर नक्कीच करतील. आणि विचार केल्यावर त्यांना नक्की पटेल आणि पटल्यावर अंमलात नक्की आणतील.” ...भाषा
“प्रयत्न तर मी करत राहणारच आहे. परंतू आता प्रयत्नांच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत हे तुझ्या बोलण्यातून कळलंय मला.” ...मी सांगितलं.
“अगं हे तर खूप थोडं आहे. सगळं सांगत बसले तर वेळ पुरायचा नाही” ...असं म्हणता म्हणता तिने परत सुरुवात केली. “परवा मी ‘आम्ही सारे खवय्ये’ बघत होते. तर ती साहित्य सांगणारी बाई म्हणाली ‘थोडे धणे’. मी सवय होऊनही क्षणभर गांगरले. ‘न’चा ‘ण’ म्हणजे शुद्ध भाषा या समीकरणामुळे मुळात ज्या शब्दात ‘न’ आहे तिथेही लोक ‘ण’ वापरू लागलेत. मला त्या कार्यक्रमात शिरून त्या बाईला सांगावसं वाटलं बाई गं धणे नाही धने म्हणतात. आणि हे तर चित्रपट-मालिकांमधलं मराठी आहे. परवा मी फलाटावर उभी असताना एक सूचना ऐकली ... ‘अंबरणाथला जाणारी जलद लोकल’. अंबरणाथ????...माझे कान तृप्त झाले गं ऐकून.
कुठल्याशा मालिकेत काल एक पात्र म्हणत ‘मी वरती जाऊन मग खालती आलो.’ वरती-खालती असे शब्द नाहीयेत. वर-खाली असे सोपे शब्द असताना ती लावून शब्दाची लांबी वाढवून चुका का करतात? कुठल्याशा पोलिसी मालिकेत एक गुन्हेगार कबुली देताना म्हणतो ‘...मग तो माझ्या पाठी लागला.’ पाठी असा मुळात शब्दच नाहीये. ‘मागे लागला किंवा पाठीमागे आला’ असं म्हणतात ...अर्थात माझी पाठ वळल्यावर मागे लागला.
हे तर मुळात अस्तित्वात असलेल्या शब्दांच्या वापराबाबत झालं. परंतु असे अनेक शब्द आहेत जे इतर भाषांच्या अतिक्रमणामुळे बाद झाल्यागत अवस्थेत आहेत. ती विजया त्या दिवशी म्हणाली ते अगदी बरोबर आहे.”
इतका वेळ मालिकांमधल्या charactersची उदाहरणं ऐकल्यामुळे ती रेशीमगाठी मालिकेतल्या विजयाबद्दल बोलतेय हे माझ्या चटकन लक्षात आलं. म्हटलं “काय म्हणाली ती?”
“ती नाही का कानातले शोधात असताना म्हणते ‘भोकरं शोधतेय. हल्ली लोकांना झुमके म्हटलं कि लगेच कळतं पण भोकरं काही कळायची नाहीत.’ खरं आहे बघ अगदी. परवा त्या ढाबळ मालिकेत पप्पन सगळ्यांची परीक्षा घेतो आणि प्रत्येकाला एक विषय देऊन त्यावर संपूर्ण मराठीत थोडं बोलायला सांगतो. एकालाही जमत नाही. त्या विनोदातून किती जहाल सत्य मांडलय!!!
मी असं म्हणत नाहीये कि इतर कुठल्या भाषा शिकू नका अथवा वापरू नका. पण त्याचबरोबर आपल्या मातृभाषेला, मराठीला विसरू नका. निदान जेवढी थोडीफार वापरता त्यात माझी लक्तरं तरी करू नका. आपली भाषा खूप समृद्ध आहे. tablespoon आणि teaspoon च्या पलीकडे जाऊन चमचे, उलतने, कालथा, ओगराळे, डाव, भातवाढी, झारा,...असे अनेक शब्द spoon जातीतल्या वस्तूंना शिकवते. अशी अनेक उदाहरणं अनेक शब्दांच्या बाबतीत देता येतील. मी असं म्हणत नाहीये कि इतर भाषेत ही शब्दसंपत्ती नाहीये. त्यांच्याकडेही असेल किंबहुना आहेच. परंतू जसा त्या भाषेचा ते लोक अभिमान बाळगतात आणि अभिमानाने ती वापरतात, तसच मराठी भाषिकांनीही करावं एवढीच माफक इच्छा आहे.”
“हो, बरोबर आहे तुझं.” ...मला यापेक्षा जास्त काही बोलायला सुचतच नव्हतं.
“चित्रपट-नाटक-मालिका यांनाच मी वेठीस धरायचं कारण म्हणजे त्यांच्यावरच याची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. त्यात जे दाखवलं-ऐकवलं जातं, त्याचं जनसामान्य अनुकरण करतात. म्हणून मनोरंजनाच्याही पुढे जाऊन त्यांची जबाबदारी सामाजप्रबोधानापर्यंत वाढते. मग ते प्रबोधन कुठल्याही बाबतीत असो... रूढी-परंपरा, विज्ञान, साहित्य, कला...किंवा भाषा ...अगदी काहीही.”
“ ... ” मी शांत होते. या समृद्ध मराठी भाषेनेच मला नि:शब्द केलं होतं. या शब्दांच्या खजिन्यातून मला यावर बोलायला शब्दच सापडत नव्हते.
“चल, निरोप घेते. खूपच वेळ घेतला मी तुझा.” ती निरोपाच्या सुरात बोलली.
“नाही गं. असं काही नाही. मला उलट छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. परत कधी फोन करशील?” मी विचारलं.
“ती वेळ नाही आली तरच बरं”...फोन बंद झाला.
************ 

मला यापूर्वी काही गोष्टींचं कधीच विशेष वाटलं नव्हतं त्यांचा हल्ली अभिमान वाटायला लागलाय.
आमच्या घरात paper नाही तर वर्तमानपत्र वाचतात. आम्ही Ad नाही तर जाहिरात बघतो. आम्ही कपडे tailorकडे नाही तर शिंप्याकडे शिवायला देतो. माझा नवरा न्हाव्याकडे केस कापून येतो. आम्ही plate मध्ये नाही तर ताटात जेवतो. आमरसाची मजा वाटीतूनच घेतो. आम्ही विमानाने परगावी जातो. lights आणि fans नाही तर दिवे आणि पंखे वापरतो. staircase नव्हे तर जिन्याचा वापर करतो. आमच्या घरात मुलं चेंडू खेळायला घेतात आणि गाडीने फिरतात. आम्ही कधीतरी बाहेर जेवायला जातो, dinnerला नाही. आम्ही इतर भाषा वापरत नाही असं नाही. ऑफिसमध्ये आम्ही English बोलतो. अमराठी लोकांशी हिंदी किंवा English मध्ये बोलतो. मुलं इतर विदेशी भाषाही शिकतात. परंतू जेव्हा आम्ही मराठीत बोलतो तेव्हा शक्यतो संपूर्ण मराठीत बोलतो....निदान तसा प्रयत्न तरी करतो.

मला या गोष्टीमुळे आणि घरात जाणूनबुजून केलेल्या भाषा सुधारामुळे मानसिक समाधान मिळतं, एकप्रकारचं सुख मिळतं. ...आणि म्हणूनच कि काय ...आमच्या घरात ‘शेगडीवर’ ठेवलेलं दूध उतू जातं.