आमच्या तिघांचं...म्हणजे
मी, आई आणि बाबा... आमचं चार-पाच दिवस दापोलीला जायचं ठरलं. कामानिमित्त जरी जायचं
असलं तरीही मी खूप आनंदात होते, कारण मला ‘त्याला’ भेटायला मिळणार होतं. कित्त्येक
दिवसांनी, जवळ जवळ वर्षभराने भेटणार होतो आम्ही. कधी एकदा त्याला भेटतेय असं मला
झालं होतं. आमचं या tripमध्ये भेटायचं ठरलही होतं. आई-बाबांचा मी त्याला भेटण्यावर
आक्षेपही नव्हता कधी.
अचानक त्यादिवशी रात्री
मंदार म्हणाला “मीपण काहीतरी adjust करतो आणि येतो तुमच्या बरोबर.”
मी चरकले. हा आला असता तर
त्याला भेटायचा माझा सगळा plan फिस्कटला असता. मी मनातल्या मनात प्रार्थना करत
होते कि ‘हा नको येऊ दे रे देवा’. मंदारच्या समोर का मी त्याला भेटणार होते? आणि
मंदारला बरं आवडलं असतं हे? त्या दोघांच्यामधून विस्तवही जात नाही. आणि मंदारसकट
मी त्याला भेटायचं? संसार मोडेल कि माझा! छे छे!! कल्पनाच करवत नव्हती मला. पण काय
करावं तेही सूचत नव्हतं. मंदारला कसं टाळाव हेच कळेना. मंदार मूळचाच कोकणी माणूस. त्यामुळे
कोकणात, त्यातूनही खुद्द दापोलीत त्याला येण्यापासून परावृत्त करणे केवळ अशक्यच.
तरीही माझे विचार चालूच होते.
मग तो घरी आल्यावर रात्री
झोपताना मी त्याला म्हटलं “हे बघ आधीच तुझ्या ऑफिसमध्ये प्रॉब्लेम्स चालू आहेत.
त्यातून तू अशी अचानक सुट्टी वगैरे घेतलीस तर तुझेच प्रॉब्लेम्स वाढतील. नवीन
नोकरीमुळे तुला सुट्ट्याही कमी आहेत यावर्षी. emergencyसाठी ठेव जपून. का आत्ता
विनाकारण वाया घालवतोयास?”
पण छे! त्याला माझ्या
समजावण्यात खोट जाणवलीच. म्हणाला “काय गं, नेहमी कुठेही जाताना ‘चल ना
माझ्याबरोबर, तुझ्याशिवाय bore होतं’ अशा complaints असतात तुझ्या आणि यावेळेस अचानक
मला येऊ नकोस असा सल्ला देतेयस? हा बदल कसा काय झाला बुवा?”
मला क्षणभर काय बोलावं
सुचेना. मग म्हटलं,
“नाही रे. यावेळेस कामासाठी
म्हणून चाललोय न आम्ही. नंतर परत तुला फिरायला नाही मिळालं तर तूच bore होशील.
म्हणून म्हटलं.”
“नाही. मी नाही होणार bore.
मी येतोय. ऑफिसमध्ये काय कारण सांगायचं ते मी बघतो.” तो म्हणाला आणि पलीकडे तोंड
करून झोपी गेला.
आता आली का पंचाईत? त्याला
कसं भेटणार? आणि मंदारसमोर भेटले तर आम्हाला दोघांनाही भांडायला नवीन कारण मिळणार.
विचारांनी डोकं भणभणायला लागलं. पण आता काही पर्यायाच उरला नव्हता. ‘कबाबमध्ये
हड्डी पडायचीच होती.’ परंतू मंदार येणार आहे म्हणून तू मला भेटायला येऊ नकोस असं
त्याला सांगणंही मला जीवावर येत होतं. मी शांत राहायच ठरवलं. plan मध्ये काहीही
बदल न करता जायचं ठरवलं. ‘होऊ दे काय व्हायचं ते. बघून घेऊ पुढंच पुढे.’ अस म्हटलं
आणि डोळे मिटून झोपेची आराधना करत राहिले. उशिरा कधीतरी झोप लागली.
सकाळी लवकरच निघायचं ठरलं
होतं. त्याप्रमाणे सकाळी लवकर उठून आम्ही आवरलं. तो दापोलीत नक्की किती वाजता पोहोचेल
हे त्याने कळवलं नसलं तरीही मी पोहोचेन त्याचं दिवशी तो पोहोचेल एवढं मात्र नक्की
सांगितलं होतं. माझी निघायच्या आधी सगळी उजळणी करून झाली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे
त्याला भेटायला जातानाचे कपडे घेतले का हे बघितलं. सगळं घेतलं होतं. आम्ही निघालो.
आपल्या जीवलगाच्या ओढीने
मनात फुलपाखरं कशी बागडतात याचा अनुभव मी घेत होते. विचारांनी मन कुठे कुठे धावत
होतं. शेजारी मंदार बसलाय याची तमा न बाळगता मनातल्या विचारांनी मी स्वतःशीच हसत
होते. मंदारनी तिथेही मला पकडलंच. म्हणाला, “काय गं, स्वतःशीच हसतेयस? काय चाललंय
डोक्यात?”
“नाही रे! काही नाही. एक
जोक आठवला, म्हणून हसू आलं.” मी सावरून घेत म्हटलं.
माझे विचार माझ्या डोक्यात
आणि त्याचे त्याच्या...छे! त्याच्या डोक्यात driving करताना का कधी विचार असतात?
तो, गाडी आणि रस्ता! बस्स! एवढंच त्याचं विश्व असतं. तो आपल्याशी बोलत जरी असला
तरीही तो वेगळ्याच विश्वात रमलेला असतो. आणि त्याला त्या विश्वात रमताना बघून मीही
रंगून जाते. पण आज मी हे क्षण enjoy करू शकत नव्हते. मला वेगळ्याच कुणाचीतरी चाहूल
लागलेली होती. त्याच्या ओढीनेच माझा प्रवास सुरु झाला होता. आणि त्याच्याबद्दल
असलेली ही ओढच मला सख्ख्या नवऱ्याशी बेईमान व्हायला भाग पाडत होती. किती विचित्र
अनुभव होता हा! एकाच वेळेस मी प्रेम, भय, आतुरता, राग सगळे भावरंग अनुभवत होते.
आणि या सगळ्या भावरंगांच्या मिश्रणातून तयार झालेला माझ्या मनातला भावरंग मला
कुठल्यातरी वेगळ्याच जगात नेऊन ठेवत होता. जिथे फक्त ‘तो आणि मी’ ठळक रंगात दिसत
होतो. आणि बाकी सगळे धूसर फिक्क्या रंगात आमच्या भोवतीने उभे राहून आमच्या ठळक
रंगाचा हेवा करत होते.
भेटीच्या ओढीने विचार अगदी
वेगात पळत सुटलेले. खाण्या-पिण्याचा ब्रेक झाल्यावर आम्ही पुन्हा मार्गाला लागलो.
आई-बाबा वाचून झाल्यावर आता डुलक्या घेत होते. इंदापूर गेल्यावर घाट लागला. मला
मधेच भास झाला कि आम्ही त्याला क्रॉस केलं. घाटातलं माझं आवडतं ठिकाण ‘देशमुख बाग
वाडी’...त्याचंही आवडतं ठिकाण. वाटलं इथेच भेटेल कि काय? पण छे! मंदारने थांबूच
दिलं नाही. मला वाडी pass होताना परत तो क्रॉस झाल्यासारखा वाटला. पण कदाचित
मनातल्या विचारांमुळे होणारे ते भासही असतील म्हणून मी सोडून दिलं.
आणि अचानक... घाट उतरताना
मला तो दिसला...क्षणभर हृदयाचा ठोकाच चुकला. मी त्याला भान हरपून बघतच बसले.
आसपासच्या सगळ्या गोष्टींचा विसर पडून मी त्याचं रूप न्याहाळण्यात गुंग झाले.
काही वेळात भानावर आले
तेव्हा मंदार मला खांद्यावर चापटी मारत विचारात होता “काय गं? कुठे तंद्री
लागलीये?”
मी काय सांगणार होते?
म्हटलं काही नाही “मस्त sexy climate चा
आनंद घेतेय.”
“असा? तंद्री लावून?”
...मंदारने विचारलं.
“हो मग! वातावरणच इतकं छान
आहे कि हरवून जावं.” ...मी
“नक्की कशात हरवलीयेस?
एकंदर वातावरणात कि एका कुठल्या ...?” मंदार
“हो हो! एकंदर वातावरणातच.”
मी त्याला तोडत म्हटलं.
अर्थात मंदारला शंका आलीच
होती, माझे इरादे नेक नाहीयेत याची. तो मला चांगलाच ओळखून होता. स्वाभाविकच आहे.
नवरा आहे तो माझा.
आम्ही दापोलीत जवळ जवळ
पोहोचलोच होतो. घाट, डोंगरमाथा, नुकतंच पाणी शिंपडलं गेल्यामुळे तरारलेली हिरवाई...
जणू न्हालेल्या नव्या नव्या नवरीसारखी मोहक दिसत होती. सगळं कसं बेधुंद करणारं
वाटत होतं. या वातावरणात एक वेगळीच नशा होती... या हिरव्या रंगाच्यासुद्धा
निसर्गात किती छटा दिसत होत्या...गडद हिरवा, फिका हिरवा, पिवळट हिरवा, काळपट
हिरवा, लाल-हिरवा, पोपटी...असे अनेक. हे रंग डोळ्यात अन मनात साठवताच येत नव्हते.
आम्हाला पोहोचायला दुपार
झाली. जेवणं आटोपून आम्ही कामाला लागलो. दोन-तीन लोकांना भेटायचं होतं. ती भेटाभेटी
केली. घराची काही कागदपत्र ताब्यात घ्यायची होती, ती घेतली. आणि सगळं आटोपल्यावर
घरी आलो. उकाड्याने आम्ही अगदी जिगजिगून गेलो होतो. फ्रेश होऊन चहापाणी होईस्तोवर
दुपार उतरली. आणि इतका वेळ विसर पडलेल्या ‘त्याची’ मला पुन्हा प्रकर्षाने आठवण
झाली. मी मंदारला म्हटलं चल दत्तावर जाऊ. दत्तमंदिर हि माझी सगळ्यात आवडती
जागा...आणि त्याचीही. तिकडे तो नक्की भेटेल याची मला खात्री होती. मंदारला पक्कं
ठाऊक आहे, मी दापोलीत आल्यावर दत्ताला जाऊन आल्याशिवाय परतणार नाही. (मी मंदारला
बोलता बोलता म्हटलंही की “मी मरायला टेकले आणि माझी शेवटची इच्छा पूर्ण करायची वेळ
आली, तर न विचारता, न सांगता मला दत्तावर आण.”)
आम्ही दत्तावर जायला निघालो.
तेवढ्यात माझ्या लक्षात आलं, मी कपडेच बदलले नाहीयेत. मी पटकन मंदारला म्हटलं “जरा
थांबतोस? मी लगेच कपडे बदलून येते.”
“नाही! अजिबात वेळ घालवायचा
नाही. मला माहितीये तुला कपडे का बदलायचेत ते. पण मी तुला अजिबात असं काहीही करू
देणार नाहीये. चल गुपचूप तशीच.” मंदारने मला दटावलं. त्याला शंका आलीच होती. मी
गपगुमान निघाले.
यावेळेस तिकडे जायला रस्ता
केला होता, चांगला डांबरी. मी खूष झाले. कारण पूर्वी कच्चा रस्ता होता. एखाद-दीड
किलोमीटर चालत जावं लागायचं. माझ्या पोटात गुदगुल्या व्हायला लागल्या. मनातली
आतुरता चेहेऱ्यावर स्पष्ट दिसू लागली.
आम्ही पोहोचलो. आधी देवळात
गेलो. दत्ताचं दर्शन घेतलं. विशेष म्हणजे त्यादिवशी नेमका गुरुवार होता. परंतू
मंदिर जुनं आणि खाजगी मालकीतलं असल्यामुळे तिथं कुणीही नव्हतं. नेहमीप्रमाणे
देवळातली दोन माणसं तिथे देवाचं म्हणत बसलेली. सहसा मी देवाकडे काही मागत नाही. पण
आज मागितलं. “देवा, आज तुझा वार आहे. मला विशेष काहीही नकोय, पण आज त्याची माझी
भेट घडवून आण. आजच्या दिवशी एवढं दान माझ्या पदरात टाक.” असं मी मनात म्हटलं आणि
नमस्कार करून आम्ही देवळाच्या बाहेर पडलो.
या देवळाच्या मागे थोडी
मोकळी जागा आहे. तिथून समुद्रकिनारा असा खाली
नजर टाकून पहावा लागतो. Below eye level समुद्र क्वचित पहायला मिळतो. तिथून खाली
किनाऱ्यावर उतरायला दगडी पायऱ्या आहेत. अतिशय निर्जन असा हा भाग आहे. अगदी
चिटपाखरूही नसतं या भागात.
दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही
या मोकळ्या भागात आलो. समोर अथांग समुद्र...नजर जाईल तिथपर्यंत फक्त पाणी आणि
क्षितिजावर अस्ताला जाण्यास अधीर झालेला सूर्य. पारणं फिटलं डोळ्याचं. सगळं
होतं...फक्त तो नव्हता. अचानक बेफाट वारा सुटला. समुद्र खवळला होताच, पण लाटांची
उंची आणि आवाज वाढवून त्याने आणखी खवळल्याचे संकेत दिले. मला चाहूल लागली म्हणून
मी डावीकडे बघितलं... तर काय!!! तो माझ्याच दिशेने धावत येत होता. मी अनाहूतपणे
त्यादिशेला धावले आणि ओरडले “मंदार बघ तो आला.”
मंदारने झर्रकन डावीकडे
पाहिलं आणि तो धावतच देवळाशी गेला.
अन क्षणार्धात पावसाने मला
कवेत घेतलं. मी त्याच्या ओल्या मिठीत भिजून गेले. “किती वाट पाहायला लावलीस?” मी
कळवळून म्हणाले, तर त्याने मला गडगडाट करून आणखीन घट्ट जवळ ओढलं. वर्षभराचा आमचा विरह
आज संपला होता. समुद्र, सूर्य आणि खुद्द दत्ताच्या साक्षीने आमच्या भेटीचा एक
अपूर्व सोहळा पार पडत होता.
तो माझ्यात अन मी त्याच्या
धारांत एकरूप झालो होतो. ओलेचिंब होऊन एका वेगळ्याच विश्वात गेलो होतो... एका अशा
विश्वात जिथे आमच्या भेटीचा रंग अगदी ठळक जाणवत होता...आणि मंदार? तो देवळाच्या
आडोशाला फिक्क्या रंगासारखा ...आमच्या प्रेमभेटीच्या ठळक रंगाचा हेवा करणारा...