रविवार दुपारची वेळ. जरा उशिरानेच जेवणं आटोपल्यावर मी वर्तमानपत्राच्या पुरवण्या
वाचत पडले होते. हल्ली शनिवार-रविवारच्या पुरवण्या खूपच वाचनीय असतात. त्या वाचण
हा माझा weekend दिनक्रमच झालाय.
वाचता वाचता वर्तमानपत्रातल्या printing mistakes ना शिव्या देण्याचं माझं कर्तव्य
मी न चुकता पार पाडत होते.
अचानक फोन खणखणला. छानपैकी पेपरचा गठ्ठा जवळ घेऊन लवंडलेलं असताना उठून फोन घ्यायचा
मला अगदी कंटाळा आला होता. पण काय करणार ‘नाईलाज को क्या ईलाज’? मी नाखुषीनेच उठले
आणि फोन उचलला.
“hello?”
“नमस्कार! हा दोन पाचशे सत्तेचाळीस सोळा पन्नास क्रमांक आहे का?” ...पलीकडून
एका स्त्रीने अतिशय मंजूळ आवाजात आणि अदबीने विचारलं. त्या आवाजात इतका गोडवा होता
कि मी सगळा वैताग विसरून गेले.
नंबर मराठीत सांगितल्यामुळे समजायला जरा वेळ लागला. आपण घरी मराठीत बोलत जरी
असलो तरीही फोन नंबर कधीच मराठीत सांगितला जात नाही. माझा क्षणभर गोंधळच झाला.
मग मी म्हटलं “हो. नंबर बरोबर आहे. आपण कोण? आणि आपल्याला कुणाशी बोलायचं?”
“मी भाषा बोलतेय आणि मला तुझ्याशीच बोलायचय.” पलीकडून आवाज आला.
“भाशा? कोण भाशा? मी नाही ओळखत.” ...मी म्हटलं
“अगं भाशा नव्हे भाषा. मी भाषा बोलतेय. पोटफोड्या ष” ...ती अगदी अजिजीनं बोलत
होती.
“बरं हो भाषा! पण मी कुणा भाषाला नाही ओळखत. तुम्हाला नक्की कुणाशी बोलायचय?”
...मी थोड्याशा वैतागानेच विचारलं.
“अगं हो हो. अशी वैतागू नकोस. मी तुझ्याशी पहिल्यांदाच दूरध्वनीवरून बोलतेय,
खरंतर संवादच पहिल्यांदा साधतेय. त्यामुळे तुझ्या लक्षात न येणं साहजिकच आहे.”
...ती स्त्री त्याच मंजूळ आवाजात जराही न कटकटता बोलत होती.
मला जरा आश्चर्यच वाटलं. मेंदूचा एक कप्पा आपसूकच आपल्याला भाषा नावाची कुणी
व्यक्ती भेटलेली का हे शोधण्यात गर्क झाला. परंतू काही केल्या ही मंजुळा मला
ओळखीची वाटेना. आवाज तर इतका गोड आणि वाणीत इतकी आत्मीयता भरलेली होती कि ही ‘मंजुळा’
आपल्या ओळखीची निघावी असं फार वाटत होतं. पण नाहीच. काही linkच लागत नव्हती.
“नाही हो. माझ्या ओळखीत कुणी भाषा नावाची व्यक्ती नाहीये.” ...मी पुन्हा
सांगितलं
मग ती भाषा (कि मंजुळा?) पुढे बोलू लागली,
“अगं मी भाषा! मराठी भाषा! जी तू आणि तुझ्या घरातली माणसं बोलण्यासाठी वापरता.
तथाकथित स्वतःला ‘आम्ही मराठी’ म्हणवणारे लोकही बोलण्यासाठी माझा वापर करतात. तीच
मी. मराठी भाषा.”
“काsssssssssय?” मी चक्रावून जवळ जवळ ओरडलेच. “कसं शक्य आहे? भाषेला का कधी
जीव असतो? ती का कधी बोलू शकते? कोण तुम्ही? आणि मला असं का फसवताय?” मी
चक्रावलेल्या अवस्थेतच प्रश्नांची सरबत्ती लावली.
“वा! बोलण्यासाठी जिचा वापर करतेस तिचं बोलू शकणंच नाकारतेस? आणि जीवाचं
म्हणशील तर हो, भाषेला जीव असतो. मनही असतं. ज्या मनावर सध्याच्या तथाकथित मराठी
भाषिकांनीच ओरखडे ओढलेत आणि घायाळ केलंय माझ्या जीवाला. तू माझा खूप विचार करतेस
असं जाणवलं. म्हणून वाटलं तुझ्याकडे मन मोकळं करावं, तू माझी व्यथा नक्की समजून
घेशील. पण तू जर इथे माझं अस्तित्वच नाकारत असशील तर तुझ्याशी बोलण्यात तरी काय
अर्थ आहे?” तिचा आवाज तितकाच मंजूळ पण किंचित दुखावलेला वाटला.
मग मीच पटकन सावरले आणि म्हणाले, “अगं भाषा थांब. sorry. चुकलंच बघ माझं. असा
अविश्वास दाखवायला नको होता मी.”
“sorry????????? अगं माफ कर असं म्हणायला कमीपणा का वाटतो? इथेच सिद्ध होतं कि
स्वभाषेत बोलताना त्या त्या शब्दातून प्रतीत होणाऱ्या भावना किती खोल असतात. तुम्हाला
sorry म्हणताना तितका अपराधीपणा जाणवत नाही जितका माफ कर किंवा क्षमा कर म्हणताना
जाणवतो.”
मला शरमल्यासारखं झालं. खरं होतं तिचं म्हणणं. मग मीच म्हणाले तिला, “माफ कर.
चूक झाली माझी.”
“नशिब माझं चूक म्हणालीस, चुकी नाही म्हणालीस. परवा त्या कुठल्याशा मालिकेत ती
नायिका आपल्या सासूला म्हणते “सासूबाई sorry, चुकी झाली माझी” हे बोलताना होणारी
चूक तिच्या लक्षातच आली नाही. शीsssss! चुकी? हा शब्द तरी आहे का गं मराठीत? मूळ
शब्द चूक आणि प्रत्यय लावून कशाबद्दल किंवा कुणाबद्दल तरी बोलताना चुकीचा/चुकीची
असं म्हणतात. परंतू हल्ली मराठी भाषा, व्याकरण दृष्ट्या चूक-बरोबर ठरवणं कठीणच
झालंय. हल्ली तर एक टूम किंवा नव्हाळी म्हणून ....तुमच्या भाषेत fashion म्हणून चुकीचे
शब्द वापरतात.”
तिने सगळे मोठमोठे भाषा तज्ञ सोडून मलाच का फोन केला ते आत्ता माझ्या लक्षात
आलं. चित्रपट-मालिकांमधे वापरल्या जाणाऱ्या मराठी भाषेवर माझी सतत चिडचिड चालू
असते.
“बरोबर आहे. तुझं म्हणणं पटतंय मला. आणि हेही कळतंय की तुला फोन करून
माझ्याशीच बोलावसं का वाटलं?” मी म्हणाले.
“योग्य शब्द वापरलास बघ तू, ‘माझ्याशी’. नाहीतर ती ईशा...”
“कोण ईशा?” मी विचारलं
“आग तीच गं ती ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ मधली ईशा. सारखं सोबत म्हणते. सगळं
तिला सोबत करायचं असतं. त्या दिवशी म्हणते कशी, ‘मी त्यांच्यासोबत फोनवर बोलून
घेतलं’... ‘त्यांच्या सोबत???’ अगं मराठी भाषा व्याकरण शिकलोय ना गं आपण शाळेत? मग
तृतीया विभक्ती प्रत्यय ने,ई,शी कसे गं विसरतात हे??? ‘त्यांच्याशी बोलले’ इतकं
साध सोप्प मराठी का उगाच क्लिष्ट करतात हे? आणि या ईशाला तर सोबत हा शब्द इतका
आवडतो ना की ती तो सगळीकडे वापरते. ‘मी येऊ का तुझ्या सोबत?’ आणि ‘आपण दोघी सोबत
जाऊ’ या दोन्ही वाक्यात हा शब्द नाही चालणार. ‘तुझ्या बरोबर येऊ का’ असं म्हणायला
हवं. ‘सोबत’ हा शब्द आपण गरज असल्यास एखाद्याच्या बरोबर जाणे यासाठी वापरतो. आणि सोबत
जाऊच्या ऐवजी ‘आपण दोघी एकत्र जाऊ’ असं म्हणायला हवं. आपल्या मराठीत आहे ना एवढी
शब्दसंपत्ती, मग वापरा ना. कमी का करताय?. ‘साथ चले’ असं हिंदीत म्हणतात ...त्याचं
भाषांतर केलं आणि दिलं ठोकून मराठीत ‘सोबत जाऊ’.”
तिच्या त्याच मंजूळ आवाजाला आता कळकळीचा सूर प्राप्त झाला होता.
“हो अगं! मलाही खुपदा, खरंतर प्रत्येकवेळी हे जाणवतं. पण बोलणार कुणाला, काय
अन किती? आपण जरा कुठे चूक दाखवायला जावं किंवा सुधारणा सुचवायला जावं तर
ग्रामीण-नागरी असा वाद सुरु करतात.” ...मी म्हटलं.
“अगं ग्रामीण-नागरी हा भाषेच्या उच्चारातला आणि त्या त्या भागातल्या लोकांच्या
वैशिष्ट्यांमध्ये असलेला फरक आहे. यात चूक बरोबर असं काहीच नसतं. कोकणी लोक
सानुनासिक उच्चार करतात तर मराठवाडा-वैदर्भीय हेल काढून बोलतात. ‘केव्हातरी’ला
कवातरी म्हणणं हा उच्चारणातला किंवा भौगोलिक दृष्ट्या भाषेला येणाऱ्या बोली
स्वरूपातला फरक आहे. या बदलामुळे तो शब्द चुकीचा ठरत नाही.”
इतके दिवस ग्रामीण-नागरी हा फरक एखाद्याला कसा समजवावा असा विचार मी करत होते.
तेच या ‘भाषा’नी अगदी सोप्प करून समजावलं.
“आता हि प्रिया. backless पोलकं घालण्याइतकी पुढारलेली दाखवली आहे. परंतू,
तिची भाषा ऐक आणि गावाहून आलेल्या आजीचं मराठी ऐक. आजी गावाकडची असून अन ग्रामीण
भाषा असून योग्य मराठी बोलते. तर ही प्रिया शहरी असून किती चुका करते. हा फरक
पाहिल्यावर शहरी लोकांना खरच पुढारलेलं म्हणायचं का असा प्रश्न पडतो.”
“कोण प्रिया? कोण आजी?” मला काहीच कळलं नाही हि कुणाबद्दल बोलतेय ते.
“आणि काय गं तू backless हा इंग्रजी शब्द कसा काय वापरलास?” मी तिची दांडी
उडवण्याच्या खट्याळ हेतूने विचारलं.
ती हसली, खूsssssssप हसली आणि म्हणाली, “अगं वेडी का काय तू? जे शब्द मुळात
मराठीत नाहीत ते मी मराठीत कसे वापरेन? backless वस्त्र मुळात आपल्या संस्कृतीत
नाही. जग खूप जवळ आल्यामुळे ते आपल्या संस्कृतीत आलं. त्यामुळे त्याला मूळ मराठी
शब्दच नाही आणि मला तो अट्टाहास कारायाचाही नाही. तुम्ही जर त्यासाठी मराठी शब्द
तयार केलात तर मला आनंदच आहे. माझीच शब्द संपत्ती वाढेल.”
तिचा मुद्दा पटण्यासारखा होता खरा. मी जरा खट्टू झाले,...मला तिची विकेट काढता
आली नाही म्हणून. ती पुढे बोलू लागली... “प्रिया आणि आजी म्हणजे हनुमानाच्या शेपटीसारख्या
वाढवत नेलेल्या ‘तू तिथे मी’ मालिकेतल्या दोघी”
“होsss! बरं झालं बाई संपली एकदाची ती मालिका. पण त्या दोघींचं काय म्हणत
होतीस तू?” ...मी
“तर ती प्रिया गं. त्या दिवशी एकदा म्हणाली, ‘तू माझ्या भांगेत कुंकू भर.’
...अगं sssss!!!!! केसांचा भांग आणि प्यायची भांग हा फरक का तिला माहित नाही?
भांगात कुंकू भरतात आणि ती भांग पितात.
आणि पुढे ऐक. एक दिवस म्हणते कशी ‘तू माझ्या वाट्याला जाऊ नकोस.’ ...वाट्यालाsssssss???
अगं संपत्तीतला वाटा, बाजारात फुलांचा मिळतो तो वाटा. परंतू आपली चालायची किंवा मार्गक्रमण
करायची असते ती वाट. ‘माझ्या वाटेला येऊ नकोस’ असं म्हणायचं असतं एवढं साध कळत
नाही?
अगं हल्ली मालिका-चित्रपटात सर्रास ‘मी आलेली, मी गेलेली’ असं म्हणतात. प्रथम
पुरुष प्रत्यायात ‘मी आले’ आणि तृतीय पुरुष प्रत्यायात ‘ती आली/गेली’ असं म्हणतात.
पण तुमच्या shortcutच्या जमान्यात सगळ्या प्रत्ययात तेच क्रियापद वापरतात. काय ही
माझी लक्तरं करताय तुम्ही? मला त्रास होतो याचा.” तिचा मंजूळ आवाज अगदी खोलात
गेला.
“तू बोलतेस ते योग्य आहे भाषा. मी माझ्या परीने खूप प्रयत्न करते माझ्या
संपर्कातल्या लोकांची भाषा सुधारण्याचा. परंतू मी कुणी महान किंवा प्रसिद्ध पंडिता
नाहीये कि मी सांगावं आणि सगळ्यांनी त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवावा.” ...मी
माझी अडचण व्यक्त केली.
“हो पण तू प्रयत्न तर करू शकतेस ना? लोकांनी लगेच विश्वास नाही ठेवला तरीही
विचार तर नक्कीच करतील. आणि विचार केल्यावर त्यांना नक्की पटेल आणि पटल्यावर
अंमलात नक्की आणतील.” ...भाषा
“प्रयत्न तर मी करत राहणारच आहे. परंतू आता प्रयत्नांच्या कक्षा रुंदावल्या
पाहिजेत हे तुझ्या बोलण्यातून कळलंय मला.” ...मी सांगितलं.
“अगं हे तर खूप थोडं आहे. सगळं सांगत बसले तर वेळ पुरायचा नाही” ...असं म्हणता
म्हणता तिने परत सुरुवात केली. “परवा मी ‘आम्ही सारे खवय्ये’ बघत होते. तर ती
साहित्य सांगणारी बाई म्हणाली ‘थोडे धणे’. मी सवय होऊनही क्षणभर गांगरले. ‘न’चा ‘ण’
म्हणजे शुद्ध भाषा या समीकरणामुळे मुळात ज्या शब्दात ‘न’ आहे तिथेही लोक ‘ण’ वापरू
लागलेत. मला त्या कार्यक्रमात शिरून त्या बाईला सांगावसं वाटलं बाई गं धणे नाही
धने म्हणतात. आणि हे तर चित्रपट-मालिकांमधलं मराठी आहे. परवा मी फलाटावर उभी
असताना एक सूचना ऐकली ... ‘अंबरणाथला जाणारी जलद लोकल’. अंबरणाथ????...माझे कान
तृप्त झाले गं ऐकून.
कुठल्याशा मालिकेत काल एक पात्र म्हणत ‘मी वरती जाऊन मग खालती आलो.’
वरती-खालती असे शब्द नाहीयेत. वर-खाली असे सोपे शब्द असताना ती लावून शब्दाची
लांबी वाढवून चुका का करतात? कुठल्याशा पोलिसी मालिकेत एक गुन्हेगार कबुली देताना
म्हणतो ‘...मग तो माझ्या पाठी लागला.’ पाठी असा मुळात शब्दच नाहीये. ‘मागे लागला
किंवा पाठीमागे आला’ असं म्हणतात ...अर्थात माझी पाठ वळल्यावर मागे लागला.
हे तर मुळात अस्तित्वात असलेल्या शब्दांच्या वापराबाबत झालं. परंतु असे अनेक
शब्द आहेत जे इतर भाषांच्या अतिक्रमणामुळे बाद झाल्यागत अवस्थेत आहेत. ती विजया
त्या दिवशी म्हणाली ते अगदी बरोबर आहे.”
इतका वेळ मालिकांमधल्या charactersची उदाहरणं ऐकल्यामुळे ती रेशीमगाठी
मालिकेतल्या विजयाबद्दल बोलतेय हे माझ्या चटकन लक्षात आलं. म्हटलं “काय म्हणाली ती?”
“ती नाही का कानातले शोधात असताना म्हणते ‘भोकरं शोधतेय. हल्ली लोकांना झुमके
म्हटलं कि लगेच कळतं पण भोकरं काही कळायची नाहीत.’ खरं आहे बघ अगदी. परवा त्या
ढाबळ मालिकेत पप्पन सगळ्यांची परीक्षा घेतो आणि प्रत्येकाला एक विषय देऊन त्यावर
संपूर्ण मराठीत थोडं बोलायला सांगतो. एकालाही जमत नाही. त्या विनोदातून किती जहाल
सत्य मांडलय!!!
मी असं म्हणत नाहीये कि इतर कुठल्या भाषा शिकू नका अथवा वापरू नका. पण
त्याचबरोबर आपल्या मातृभाषेला, मराठीला विसरू नका. निदान जेवढी थोडीफार वापरता
त्यात माझी लक्तरं तरी करू नका. आपली भाषा खूप समृद्ध आहे. tablespoon आणि
teaspoon च्या पलीकडे जाऊन चमचे, उलतने, कालथा, ओगराळे, डाव, भातवाढी, झारा,...असे
अनेक शब्द spoon जातीतल्या वस्तूंना शिकवते. अशी अनेक उदाहरणं अनेक शब्दांच्या
बाबतीत देता येतील. मी असं म्हणत नाहीये कि इतर भाषेत ही शब्दसंपत्ती नाहीये.
त्यांच्याकडेही असेल किंबहुना आहेच. परंतू जसा त्या भाषेचा ते लोक अभिमान बाळगतात
आणि अभिमानाने ती वापरतात, तसच मराठी भाषिकांनीही करावं एवढीच माफक इच्छा आहे.”
“हो, बरोबर आहे तुझं.” ...मला यापेक्षा जास्त काही बोलायला सुचतच नव्हतं.
“चित्रपट-नाटक-मालिका यांनाच मी वेठीस धरायचं कारण म्हणजे त्यांच्यावरच याची
सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. त्यात जे दाखवलं-ऐकवलं जातं, त्याचं जनसामान्य अनुकरण
करतात. म्हणून मनोरंजनाच्याही पुढे जाऊन त्यांची जबाबदारी सामाजप्रबोधानापर्यंत
वाढते. मग ते प्रबोधन कुठल्याही बाबतीत असो... रूढी-परंपरा, विज्ञान, साहित्य,
कला...किंवा भाषा ...अगदी काहीही.”
“ ... ” मी शांत होते. या समृद्ध मराठी भाषेनेच मला नि:शब्द केलं होतं. या
शब्दांच्या खजिन्यातून मला यावर बोलायला शब्दच सापडत नव्हते.
“चल, निरोप घेते. खूपच वेळ घेतला मी तुझा.” ती निरोपाच्या सुरात बोलली.
“नाही गं. असं काही नाही. मला उलट छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. परत कधी
फोन करशील?” मी विचारलं.
“ती वेळ नाही आली तरच बरं”...फोन बंद झाला.
************
मला यापूर्वी काही गोष्टींचं कधीच विशेष वाटलं नव्हतं त्यांचा हल्ली अभिमान
वाटायला लागलाय.
आमच्या घरात paper नाही तर वर्तमानपत्र वाचतात. आम्ही Ad नाही तर जाहिरात
बघतो. आम्ही कपडे tailorकडे नाही तर शिंप्याकडे शिवायला देतो. माझा नवरा
न्हाव्याकडे केस कापून येतो. आम्ही plate मध्ये नाही तर ताटात जेवतो. आमरसाची मजा
वाटीतूनच घेतो. आम्ही विमानाने परगावी जातो. lights आणि fans नाही तर दिवे आणि
पंखे वापरतो. staircase नव्हे तर जिन्याचा वापर करतो. आमच्या घरात मुलं चेंडू खेळायला
घेतात आणि गाडीने फिरतात. आम्ही कधीतरी बाहेर जेवायला जातो, dinnerला नाही. आम्ही
इतर भाषा वापरत नाही असं नाही. ऑफिसमध्ये आम्ही English बोलतो. अमराठी लोकांशी
हिंदी किंवा English मध्ये बोलतो. मुलं इतर विदेशी भाषाही शिकतात. परंतू जेव्हा
आम्ही मराठीत बोलतो तेव्हा शक्यतो संपूर्ण मराठीत बोलतो....निदान तसा प्रयत्न तरी
करतो.
मला या गोष्टीमुळे आणि घरात जाणूनबुजून केलेल्या भाषा सुधारामुळे मानसिक
समाधान मिळतं, एकप्रकारचं सुख मिळतं. ...आणि म्हणूनच कि काय ...आमच्या घरात ‘शेगडीवर’
ठेवलेलं दूध उतू जातं.
No comments:
Post a Comment