काही
दिवसांपूर्वी TVवर एक जाहिरात पहिली... Ambi Pure Room Freshner ची. त्यात
तो बोमन इराणी घरोघरी जाऊन त्यांच्या घरातल्या दुर्गंधी घालवतो. (तसं हल्ली celebrities नी सामन्यांची घरं साफ करायचं fadच
आलंय)...तर...त्यात तो कुणाच्या तरी घरी जातो आणि त्यांना त्यांच्या घरातले नावडते
दुर्गंध विचारतो आणि Ambi Pure हे product वापरून ते घालवून दाखवतो; अशी त्या
जाहिरातीची मूळ संकल्पना आहे. तर या जाहिरातीत अशाच एका घरात तो जातो आणि त्या
गृहिणीला विचारतो कि बाई गं असा कुठला वास आहे ज्याचा तुम्हाला तुमच्या घरात त्रास
होतो अथवा घाण येते? यावर ती बाई जरा विचार केल्यासारखा दाखवते आणि म्हणते ...
“अं...? तडका! तडका कारानेके बाद घर में जो odour फैलता है, क्या उसे आप मिटा सकते
हो?”
मी हे वाक्य ऐकून अवाक् झाले. तडका???? अर्थात फोडणी? ज्या
फोडणीच्या वासावरूनच आपली अर्धीअधिक भूक चाळवली जाते ती फोडणी?
मी youtubeवर ती
जाहिरात २-३ वेळा पहिली आणि इतकं दुःख झालं मला! या फोडणीच्या खमंग वासाला odour
अर्थात दुर्गंधी म्हणताना या बाईला क्षणभरही त्रास नाही का झाला? आपल्या संस्कृतीत
पदार्थ सगळ्यात आधी वासाने म्हणजेच नाकाने, मग डोळ्यांनी आणि मग तोंडानी खाल्ला
जातो. अशा या वासाला सर्वाधिक महत्त्व असलेल्या संस्कृतीचा भाग असलेली ही बाई त्या
स्वर्गीय खमंग वासाला odour म्हणते??? आमच्याकडे काकूसुद्धा मी स्वयंपाक करताना मधेच
ओरडतात “उधळली तुझी फोडणी. वाश आला! वास नाही आला पाहिजे फोडणीचा.” अरेsssss??? मग
अर्थ काय त्या फोडणीला? त्यातच तर सगळी मजा आहे.
परवा आमच्या घरी माझा एक मित्र आला. आल्या आल्या आत
शिरतानाच म्हणाला “व्वा! छानपैकी लोणी कढवून झालेलं दिसतंय!” त्या खमंग तुपाचा वास
अजूनही घरात दरवळत होता. हा इतका सुंदर गंधही बऱ्याच जणांना तोंड वेंगाडण्यासारखा
का वाटतो कुणास ठाऊक! आणि room freshner च्या जाहिरातीसाठी तुम्ही ज्या फोडणीच्या
वासाला odour म्हटलंत तीच फोडणी खमंग होण्यासाठी जो हिंग वापरतात, त्या हिंगाच्या
जाहिरातीसाठी मात्र त्या वासाला महत्त्व दिलंय. काय हा विरोधाभास??? आपल्या
संस्कृतीतल्या इतक्या महत्वाच्या गोष्टीचं किती चुकीच्या पद्धतीने marketing
होतंय? हल्ली भावभावनांपासून ते चापालांपर्यंत कुठल्याही गोष्टीचा marketing किंवा
advertising tool म्हणून वापर केला जातो. बदलत्या काळानुसार ते स्वाभाविक आहे आणि
कदाचित गरजेचंही आहे. परंतु हे करताना आपण कुठल्याही मूल्यांची पायमल्ली तर करत
नाही ना, कुठल्या गोष्टींबद्दल समाजाला चूकीचा संदेश तर नाही ना देत याबद्दल
जागरूक राहायला हवं.
आपल्या संस्कृतीत खमंग, खरपूस, करपट, गोडसर, आंबट,
मसालेदार, कडू या नुसत्या चवी नाहीत तर वासही आहेत. त्या, आधी आपल्या
घ्राणेन्द्रीयांना कळतात आणि मग पदार्थ खाल्ल्यावर जिभेला किंवा रसनेला कळतात.
त्या दिवशी भाजी करताना मी आंबट चुका आणि आळू शिजवलं कुकरमध्ये.
कुकर निवल्यावर झाकण उघडल्या उघडल्या जो काही अप्रतिम गंध वातावरणात दरवळला त्याला
तोड नाही. आपण कुठली भाजी शिजवतोय किंवा परततोय हे वासावरून ओळखू शकतो. खरंतर ती
शिजवतोय कि परततोय हेही वासावरूनच कळतं. एखादी उसळ गोडा मसाला घालून केलीये, कि
मालवणी मसाल्याची आहे कि घाटी/आगरी/वैदर्भीय किंवा इतर कुठल्या मसाल्याची आहे हे
त्या उसळीच्या वासावरूनच ओळखतो आपण. एवढंच कशाला त्या उसळीच कडधान्य देखील
शिजवताना त्याला आलेल्या उकळीवरून किंवा कुकरच्या शिट्टीच्या वासावरून ते कडधान्य
कुठलं आहे हे कळू शकतं. पूजेचं अथवा कार्यालयातल्या वरण भातातलं वरण हे गोडं वरण
आहे कि साधं; हे ते उकळतानाच कळतं. कार्यालयातल्या जेवणाचा एक विशिष्ट गंध,
उडप्याच्या हॉटेलातला एक typical वास, किंवा bar & restaurant मधल्या मद्य आणि
तंदूर मिश्रित असा खाद्यपदार्थांचा वासाचा एक विशिष्ट दरवळ, पिझ्झा-बर्गर outlet
मधील पाव आणि oragano मिश्रित एक वास हा त्या त्या ठिकाणच्या पदार्थांच्या विशिष्ट
प्रमाणातील चायामुळे अथवा एकत्रीकरणामुळे(combination) येतो.
एखादी उत्तम सुगरण पदार्थात मीठ आहे कि नाही हे सुद्धा त्या
पदार्थाच्या वासावरूनच ओळखते.
आपल्या संस्कृतीत कुठला पदार्थ कधी आणि किती खावा याचेही
विधिनिषेध ठरलेले आहेत. ठराविक वेळेला ठरलेले अन्नपदार्थ शिजवून त्याचा सुगंध
वातावरणात दरवळतो आणि त्या वेळेची, समारंभाची अथवा कार्याची वातावरण निर्मिती होते
आणि आपल्या शरीरातील घ्राणेन्द्रिये उद्दीपित होऊन भूक लागते अथवा तो पदार्थ
खाण्याची इच्छा प्रज्वलित होते. या शास्त्राधारित गोष्टीचा आधार घेऊनच आपल्या
संस्कृतीत खाद्यपादार्थ बनविण्याचे काही विधिनिषेध आखलेले आहेत.
पावसाळी कुंद
वातावरणातच आपल्याला भजी/वडे अथवा तत्सम तळण खावेसे वाटते. किंवा थंडीच्या
दिवसात पचायला जड पदार्थ किंवा गरमा गरम वाफाळलेला चहा प्यावासा वाटतो. लग्नकार्य
अथवा होम-हवनाच्या दिवशी आपल्याकडे सात्त्विक शाकाहारी जेवणाची पद्धत आहे कारण
त्यावेळी होत असलेल्या पूजा कार्यामुळे वातावरणात आणि उपस्थित मानवी शरीरात प्रचंड
प्रमाणात उर्जा निर्मिती होते. म्हणून त्या उर्जेच्या पातळीला balance करण्यासाठी
आपल्याकडे त्यावेळेस सात्त्विक भोजनाची पद्धत आहे.
मुळातच आपल्या संस्कृतीत खाद्यपदार्थांची स्वतःची अशी वेगळी
जागा आहे आणि त्यांच्या येणाऱ्या गंधांची स्वतःची एक ओळख आहे. त्याचं आपल्या
आयुष्यात एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. जे आपण ठरवूनही डावलू शकत नाही.
निरनिराळ्या चटण्या, कोशिंबिरी, आमट्या, भाज्या यांचे
विशिष्ट गंध आहेत. तळण काढत असतानाही स्वयंपाकघराच्या बाहेर बसलेली व्यक्ती त्या
तळणीत पुऱ्या आहेत, कि वडे-भजी आहेत, कि पापड-कुरडया-सांडगे आहेत हे ओळखते. एवढंच काय
तर पापड उडदाचा आहे कि पोह्याचा कि बटाट्याचा कि आणखी कसला हेही तळणीच्या
वासावरूनच कळतं.
त्या AmbiPureच्या जाहिरातीतील बाईचे डोळे बंद करून तिच्या
नाकासमोर लोणच्याची किंवा खारातल्या मिरचीची बरणी धरून, वासावरून तोंडाला पाणीही
सुटू शकतं हे पटवून द्यावंसं वाटतंय. किंवा त्याच लोणच्याची फोडणी (तिच्या भाषेत
तडका) करताना तिला तिथे उभा करावं अस वाटतंय. म्हणजे फोडणीच्या वासाची जादू तिला
कळेल. हे लिहिताना देखील इथे नसलेल्या लोणच्याचा वास येऊन माझ्या तोंडाला पाणी
सुटलंय.
नुसतं फोडणी तळणीच्या गडद वासाबद्दल नव्हे तर फळे, गोड
पदार्थांच्या सौम्य वासाचीही अशीच गम्मत आहे. उन्हाळ्यात पन्ह किंवा कोकम
सरबताच्या नुसत्या वासानेच गार वाटतं. लिंबू, कैरी, चिंचेच्या आंबट वासाने एखादी
गर्भवती सुखावते तर लहानमुलं गुलाबजाम, बासुंदी इतकंच काय तर cake किंवा pudding
च्या वासाने त्या पदार्थाकडे अक्षरशः धाव घेतात. हा सगळा वासाचाच तर खेळ आहे. आपलं
आयुष्यच जणू खाद्य-गंधांच्या तालावर नाचत. त्या गंधांनी भरलेल्या वातावरणातच तर आपण
लहानाचे मोठे होतो. इतकंच काय तर प्रत्येक घराची देखील एक गंध-संस्कृती असते.
भैय्या लोकांच्या घरातला राईच्या तेलाचा वास, गुजराथी-मारवाडी घरांमधला तुपाचा
वास, दक्षिणात्य घरांमधला सांबार-रस्सम मसाल्यांचा वास, गोवन ख्रिश्चन घरातील
माशाच्या आमटीचा/curry चा वास हे त्या त्या घरातल्या खाद्य-संस्कृतीचं
प्रतिनिधित्व करतात.
अशा या गंध-संस्कृतीतल्या फोडणीसम कुठल्याही वासाला ‘दुर्गंधी’
किंवा ‘odour’ म्हणण्याची चूक कृपा करून या product
manufacturers नी करू नये. आपल्याकडे सगळ्याच पदार्थाचं मूळ किंवा पाया असलेली
फोडणीच जर जमली नाही तर पुढे त्या पदार्थाची बांधणीच फसते. इतकी अनन्यसाधारण आणि
अतीव महत्वाची अशी हि गोष्ट आहे. तिलाच जर कुणी ‘दुर्गंधी’ संबोधलं तर त्यांच्या
घ्राणेन्द्रियात आणि त्याच्याशी निगडीत शरीरातील हार्मोन सिस्टीम मध्ये नक्की बिघाड
आहे.
यापलीकडे जाऊन बोलायचं झालं तर, ज्या माणसांना फोडणीचा वास
odour वाटतो त्यांना, पहिल्या पावसानंतरचा मृद्गंध, उन्हाळ्याच्या आधी मोहोरलेल्या
आंब्याचा वास, फुलबागेताला फुलांचा धुंद गंध, नव्या वहीचा कोरा वास, नव्या कापडाचा
नवा वास... इतकंच काय तर नव्या चपलांचा चामडी वासदेखील काय गंधानुभव देतो हे कसं
कळणार?
great!
ReplyDeletekiti sundar lihilays aga !!!
ReplyDelete