परवा सकाळ सकाळ मंदार
वैतागून म्हणाला “काय केकाटतेय हि कोकिळा!”
तेवढ्यात काकू म्हणाल्या “अरे
कोकिळा नाही गात कोकीळ गातो.”
“जे कोण आहे ते...पण किती
कर्कश्श!” ...मंदार
“अरे त्यांचा ऋतू आहे तो,
ते ओरडणारच. हा त्यांचा मीटिंग सिझन असतो म्हणे” ...काकू
“एकतर उकडतंय आणि त्यातून
सकाळच्या घाई-गडबडीत हे केकाटण....वैताग नुसता” ...मंदार उकाड्याला वैतागून
म्हणाला.
“खरंतर आपण किती भाग्यवान
आहोत कि मुंबईसारख्या शहरी भागात राहूनही आपल्याला कोकिळेचं कूजन ऐकायला मिळतं”
...मी म्हटलं
“कूजन????????????????”
...मंदार आणखीनच वैतागून जवळ जवळ ओरडलाच. “या केकाटण्याला कूजन म्हणणारी व्यक्ती
अंमळ अधू बुद्धीची किंवा अधू कर्ण क्षमतेचीच असली पाहिजे! कूजन म्हणे ...”
आमच्या घरातला हा एका
उन्हाळ्यातल्या लक्ख सकाळचा ‘प्रेमळ’ संवाद ऐकून मी स्वतःच विचारात पडले. ‘खरच
आपल्याला हा आवाज ऐकू येतो यात आनंद मानायचा कि शहरात राहून या सगळ्या गोष्टींची
सवय सुटल्यामुळे त्या गोष्टींचा त्रास वाटून घ्यायचा?
मला मान्य आहे कि global warming वगैरे गोष्टींमुळे सध्या
पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे. ऋतुचक्र थोडे बदलले आहे. उन्हाळा-पावसाळा-हिवाळा
हे चार चार महिने वास्तव्याला राहणारे ऋतू आता आपलं नेहमीचं गणित बदलून
वास्तव्याला येतात. परंतु, तरीही ते जेव्हा येतात तेव्हा त्यांचं आनंदानं,
प्रेमानं आणि उत्साहानं स्वागत आपण करायला हवं. आपण खरंतर किती नशिबवान आहोत कि निसर्गाचे हे ऋतूसोहळे आपल्याला या ग्लोबल वार्मिंग मधेही
अनुभवायला मिळतात.
उन्हाळ्यात “किती उकडतंय!” आणि पावसाळ्यात “किती हा चिखल!” असं म्हणत त्या
त्या ऋतूंचा आनंद लुटण्याऐवजी आपण त्यांना बोल लावतो. आपल्याकडे चैत्रप्रतीपदेनंतर
येणाऱ्या लख्ख प्रकाशाच्या वसंतोत्सवाच उत्साहाने स्वागत करण्याची रीत आहे. या कडक
उन्हाळ्याबरोबर येणाऱ्या उन्हाळी मेव्याचा आस्वाद आपण तितक्याच उत्साहाने घ्यायला हवा.
आंब्यासारख्या फळांच्या राजाला वाजत-गाजत घरी आणायला हवं. आमरस, आंबापोळी,
आंबावडी, पाडाचे आंबे, आंबेडाळ, कायरस अशा variety वर ताव मारायला हवा.
मला तर उन्हाळ्यात नेहमीच एक स्वप्न पडत. अशीच एक भर ‘मे’ महिन्यातली रविवार सकाळ
आहे. (मंदारच्या भाषेत केकाटणाऱ्या) कोकिळेच्या कूजनाने मला सकाळी जरा उशिरानेच
जाग आलीये. मी उठल्या उठल्या खिडकीचे पडदे उघडले आणि एकदम रंगपंचमीला अंगावर रंग
उधळतात तसं सूर्यप्रकाशाचा सोनेरी रंग खुद्द सुर्यानेच माझ्या अंगावर उधळलाय. माझी
सकाळ खिडकीतून येणाऱ्या उन्हाने न्हाऊन शुचिर्भूत झालीये. मी छानपैकी वाफाळलेला
चहा घेऊन वर्तमानपत्र वाचत बसलेय आणि वाचता वाचता दुपारच्या जेवणाचा बेत अखातेय.
(कडकडीत उन्हाळ्यातही तरतरी आणणारं एकमेव पेय म्हणजे चहा.) दिवसाच्या या प्रसन्न
सुरुवातीनंतर मी मस्तपैकी पोह्यांचा नाश्ता करून दुपारच्या जेवणाच्या तयारीला
लागलेय. दुपारी मस्त आमरस पुरी, मावळी काकड्यांचा कीस, भरपूर ताक असा काहीसा बेत
आखलेला आहे. जरा गारवा म्हणून मधेच थोडसं कोकम सरबत प्यायलय. दुपारी आमरस पुरीच्या
बेतावर ताव मारून झाल्यावर घरात छानपैकी झोपाळ्यावर बसून मी पुस्तक वाचतेय. बाहेर
खिडकीतून मुलांच्या हुंदडण्याचे, खेळण्याचे, बॉल मारल्याचे, खेळातल्या भांडणाचे
आवाज येतायत. दुपारी चहाच्या ऐवजी थोडं पन्ह घेतलंय. आणि संध्याकाळी मस्तपैकी bright colour combinationचे कपडे परिधान करून
या वसंत देखाव्याचं दर्शन घ्यायला मी बाहेर पडलेय. किती सुंदर स्वप्न आहे हे!!!!
या जिगजिगणाऱ्या उकाड्यात “शीSSSS!
किती उकडतंय?” अस म्हणण्यापेक्षा “जरा गार पन्ह पिऊ म्हणजे
थोडं बर वाटेल’’ असं आपण का नाही म्हणत??? सारखं गरमा सहन होत नाही असं म्हणून A/C लावून बसण्यापेक्षा छानसे
सुती कपडे घालून बाहेर पडाव. मोठ्यांनी बाजारहाट करावी, लहान-तरुणांनी उन्हाळी खेळ
खेळावेत, वृद्धांनी कट्ट्यावर गप्पा छाटत बसावं. आणि हा उकाडासुद्धा सुसह्य
करण्याचा प्रयत्न करावा.
नका हो त्याला बोल लावू,
बोलू नका अधिक-उण.
निसर्गाचं चक्र तोच सांभाळतो,
गाऊ त्याच्या गोडव्याच गाणं.
चार प्रेमाच्या गोष्टी ऐकून,
उन्हाळ्यालाही जरा गार वाटेल.
आणि तो गार झाला जरा तर...
आपल्यालाही त्याचा ताप कमी वाटेल.
घाईघाईने निघून जर कधी लवकर आलाच...
तर चिडू नका त्याच्यावर.
पाटावर बसवून त्याला कोकम सरबत द्या,
तोही विश्रामेल घटकाभर.
आला आहेस तसा राहा दोन महिने,
आम्हालाही जरा बर वाटेल.
तुझ्याचमुळे मुलांना सुट्टी मिळते,
त्यांच्याही मनात आनंद दाटेल.
प्रेम-कौतुक करून त्याची,
दरवर्षी वेळेत रवानगी करा...
पावसाळ्या संगे त्याच्या,
निरोपाचं गाणं म्हणा.
पावसाळ्या संगे त्याच्या,
निरोपाचं गाणं म्हणा.
या ऋतूचं..., खरंतर प्रत्येक ऋतूचं आगमन हा एक निसर्गनियमच आहे. जसे आपण इतर
ऋतूंच्या भोवती सणवार आणि खाद्य पद्धती गुंफल्या आहेत, तसच उन्हाळ्यातही आहे. आणि
त्या त्या गोष्टी खाऊन-पिऊन आपण हा ऋतूही साजरा करायला हवा.
हा उकाडा होतो म्हणून तर आपल्याला पावसाळ्याचा गारवा कळतो. हे तर जगाचं
तत्त्वच आहे. दुख आणि वाईट अस काही जर नसतं तर आपल्याला सुख आणि चांगलं म्हणजे काय
हे कळलच नसतं. खरंतर पावसाळी गारव्याचा अर्थ सामाजावाण्यासाठीच हा उन्हाळा
सगळ्यांचे शिव्याशाप सहन करूनही दरवर्षी नित्यनेमाने येतो. कारण त्याला माहितीये
हे संपूर्ण ऋतुचक्रच त्याच्यावर विसंबून आहे. शेती, पाऊसपाणी सगळेजण त्याच्याचमुळे
आपापली कर्तव्ये पार पाडू शकतात. म्हणूनच त्याचं येणं, असणं, राहणं आणि वेळेवर
जाणही फार महत्वाचं आहे.
Masta!!!
ReplyDeleteMasta!!!
ReplyDelete